आमचे चितळे बाबा

आमचे चितळे बाबा
आपल्या नेहमीच्या स्थानावर विराजमान

Monday 12 December 2011

१०. हवाईदलात भरती व नंतरच्या मजा - भाग २


१०. हवाईदलात भरती नंतरच्या मजा - भाग

असे करत असताना एकदा हवाईदलात भरती असे त्यांच्या वाचनात आले आणि त्यांनी तो अर्ज भरला. मॅट्रिकपर्यंत कसेबसे शिक्षण, मराठी माणसाची इंग्रजी बोलण्याची पंचाईत यामुळे आपला पाडाव लागणार नाही अशीच बाबांची धारणा होती. परंतु, पुढे विविध कारणांनी बाबांची हवाईदलातील अनेकांची जीवने उद्धरायची असल्याने बाबांना हवाईदलात नोकरी मिळाली आणि एसी 2 म्हणजेच एअर क्राफ्ट्समन 2 म्हणून ते भरती झाले. एकंदरीत बेताच्या इंग्रजी संभाषण कलेमुळे त्यांना इक्विपमेंट असिस्टंट असा ट्रेड म्हणजे कामाचा प्रकार मिळाला. होता होता पुढे बाबा मास्टर वॉरंट ऑफिसर या उच्चपदाला पोचून १९९६ला निवृत्त झाले. सदतीस-अडतीस वर्षांचा हवाईदलातील मधला हा काळ कसा चुटकीसरशी गेला असे ते वेळोवेळी म्हणतात.

हवाईदलात अगदी सुरूवातीला त्यांची मुंबईच्या कॉटनग्रीनला बदली झाली. त्या स्टेशनमध्ये रिपोर्ट करण्याच्या आधीच एक दिवस त्यांची एकाशी शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर त्यांच्या असे लक्षात आले की तोच त्यांचा बॉस होता. पुढे कटू प्रसंग टाळण्यासाठी त्यांना देवळालीला (२५ ईडी - इक्विपमेंट डेपो) काही महिन्यासाठी पाठवण्यात आले. बाबांनी थोडेसे नाराजीनेच देवळालीला प्रयाण केले. परंतु, ईश्वर कृपेने तेथे आणखी काही वेगळाच प्रकार पुढे वाढून ठेवला होता. त्याठिकाणी त्यांची रेल्वेस्टेशनवर काशीविश्वेश्वर महाराजांची गाठ पडणे, त्यांनी त्यांना रेल्वेच्या एका पुलाखाली पुढील कार्याच्या दिशेसाठी एका अदभुत अनुभवाची प्रचती देणे वगैरे गोष्टी तेथे घडल्या.

बाबा सांगतात एकदा 1965च्या संग्रामात मी अंबाल्याला होतो. सुरूवातीच्या पाकिस्तानी हवाई हल्ल्यात सगळीकडे पळापळ व घबराट झाली. बाँबचे गोळे विमानपट्टीवर कोठेही कोसळत होते. त्यामुळे निर्माण होणारे भलेमोठे खड्डे आणि त्यातील स्प्ल्रिंटरचा मारा होऊन अनेकजण जखमी होत होते. बाबांना त्या अनुभवातूनही जावे लागले आणि त्यांना शारीरीक त्रास होऊन पाठीच्या कण्याला कायमची इजा झाली.

इजेवरून आठवले मध्यंतरी काही वर्षापूर्वी बाबा आपल्या एका शिष्याची भेट घेण्यासाठी स्कूटरवरून निघाले. अंधार पडण्याची वेळ, वाहनांनी गजबजलेला रस्ता, घरापासून थोडे अंतर कापून गेल्यावर बाबांना जोरात धक्का बसला आणि ते वाहनावरून फेकले गेले. घटनेला पाहणाऱ्या लोकांनी ताबडतोब बाबांनी ओळखले आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था केली. घरचे आले, हॉस्पिटलमध्ये बाबांनी डोळे उघडले तेव्हा ते कोरेगाव पार्कमधील बुधराणी हॉस्पिटलमध्ये असल्याचे त्यांना लक्षात आले. बरगड्यांना मार लागून त्या अधु होऊन गेल्या. बरेच रक्त जावून अशक्तपणा आला. सर्व ट्रिटमेंटला काही महिने लागतील असा डॉक्टरांनी अंदाज व्यक्त केला होता. पण पुढच्या गुरूवारची आरती करायला बाबा आपल्या घरी हजर होते! पाचव्या दिवशीच मी ठीक आहे मला घरी जाऊ द्या. त्या मोडलेल्या बरगड्यांना प्लास्टर किंवा बाह्य उपचार करता येणार नाहीत अत्यंत कमी वेळात त्या कशा आपोआप ठीक झाल्या असे हॉस्पिटलमधील डॉक्टर लोकांनी आश्चर्याचे उदगार काढले.

आज बाबा गिरनारसारख्या दहा हजार पायऱ्या चढून जाऊ शकतात. विनम्रपणे आपल्या गुरूंना म्हणजेच नवनाथांपैकी जालंदरनाथांना सत्तराव्या वर्षातील त्यांच्या त्या हिम्मतिचे आणि धाडसाचे सर्व श्रेय ते वेळोवेळी देत असतात.

हवाईदलात असताना कानपुरला एक सायकल विक्रेता होता. बाबांनी त्या विक्रेत्याला आणि त्यांच्या कुटूंबियांना जी मदत केली त्याचा किस्सा ते सांगताना कधी-कधी डोळ्यात पाणी येते. आज तोच सायकलवाला एक मोठा वाहनांचा डीलर बनून बाबांना आग्रा व कानपुर भागात वारंवार भेट द्यायला बोलावतो.

बाबांचे अनेक शिष्य देशाच्या विविध भागात आहेत. त्यापैकी एक कर्नल तिहोतिया यांचे वेगळेच स्थान आहे. सहा फुटांपेक्षा उंच, अत्यंत भरभक्कम शरीरयष्टी, चेहरा व मान सिंहाप्रमाणे भरदार, बोलण्यात आणि वागण्यात मिलीटरीतील शिस्तीचा करारीपणा आणि वागण्यात हरयाणी रांगडेपण. कर्नल तिहोतियांचे आणि बाबा यांचे एकत्र येणे अजबच. कारण हवाईदलापेक्षा आर्मीमध्ये रँकवर फार प्रकर्षाने भर दिला जातो. ऑफिसरच्या क्वॉटर्समध्ये आदर रँकच्या व्यक्तींना प्रवेश कटाक्षाने टाळला जातो आणि तसेच ऑफिसर्सनी ओआरकडे म्हणजे ऑफिसर्स रँकच्या खाली व्यक्तींकडे जाणे सामान्यतः गैर मानले जाते. बाबांच्या बाबत माञ अनुभव उलटा आहे.

उच्च पदस्थ ऑफिसर्स ते अगदी सामान्य कार्पोरल किंवा शिपाईपर्यंत मराठी वा अमराठी सैनिकी पेशातील लोक बाबांकडे येतात तेव्हा समानतेची वागणूक अपेक्षित करतात. त्यामुळे ते आसाममध्ये बागडोग्र्याला असताना तिथल्या कमांडींग ऑफिसरच्या हुकूमांना न जुमानता अनेक आर्मीची वाहने व त्यातून त्यातून बडेबडे आर्मीचे ऑफिसर्स बाबांच्या छोटाश्या पण नेटक्या क्वॉर्टरमध्ये येत आणि आपल्यावरील शारीरीक व मानसिक संकटांची कहाणी सांगुन त्यातून आपली सुटका करून घेत.

आसाममध्ये असताना एअरमार्शल दुश्यंतसिंग हे इस्टर्न एयर कमांडचे मुख होते. त्यांच्या दराऱ्याच्या आणि जबरदस्त करारी व कठोर स्वभावाच्या अनेक गोष्टी आम्हा हवाईदलातील लोकांना अनुभवून ज्ञात आहेत. त्यांच्या अति कडक कारवायांमुळे त्यांचे नाव दुश्यंत ऐवजी दुश्मन असे चर्चेले जात असे. आसाममध्ये फार जलद गवताच्या हिरवळीची वाढ होते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक एअरमन व ऑफिसरला हातात तलवारवजा शस्त्र देऊन ते गवत कापण्याचा त्यांचा हुकूम बाबांना मानवला नाही. बाबांनी ते गवत कापायचे काम करणार नाही असे कमांडींग ऑफीसरला ठणकावून सांगितल्यावर त्यांची इन्स्पेक्शनला आलेल्या एअरमार्शल दुश्यंतसिंगांसमोर झाली आणि त्यावेळी बाबांनी इतके बाणेदार उत्तर दिले, ‘मी हवाईदलाची नोकरी गवत कापल्याला करत नाही. ते काम माझ्यासाठी लिहून ठेवलेले नाही. म्हणून मी ते काम करू शकत नाही. आपल्याला जे काही करायचे ते आपण करू शकता’. एकंदरीत बाबांचा रागरंग पाहून दुष्यंतसिंगांनी नरमाईचे धोरण आखले आणि त्यांच्यावर कारवाई न करता प्रश्न सुटून गेला आणि बाबांनी गवत कापायची तलवार कधी घेतली नाही.

आर्मिचरचे किटाळ व कोर्टमार्शलची पाळी, नागपुरला ‘कोण रे तू?’ म्हणणाऱ्या एकांची नंतर बाबा तुम्ही? म्हणून उडालेली तारांबळ आदि किस्से नंतर ...

असे अनेक किस्से बाबांच्या मुखातून ऐकताना वेळ कसा जातो कळत नाही.

No comments:

Post a Comment