बाबा सांगतायत काही आपल्या जीवनातील ३ किस्से –
1. अदभूत हनुमान दर्शन!
“हे स्वप्न नव्हत! हनुमंतरायांनी मला दर्शन दिलं”
डिसेंबर किंवा 1980 जानेवारीचा काळ. तारीख मला अचूक आठवत नाही. पहिला मुलगा शैलेश उर्फ पपु झाला होता. त्याच्या पत्रिकेमध्ये कर्क लग्न. व्दितीय स्थानामध्ये कन्या राशी येते. कन्या राशी म्हणजे मुलाच्या पाठीवरती मुलगी दाखवते. म्हणून हनुमंताची सेवा सुरू केली.
तीन-चार वर्षे पूर्ण सेवा केल्यानंतर मला त्यांनी दृष्टांत दिला की, मला आणखी त्रास देऊ नको. म्हणून मी पुढची सेवा बंद केली. 1980च्या जानेवारी महिन्यामध्ये एके दिवशी मध्यरात्री दोन-सव्वा दोन वाजता मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये हनुमंतराया प्रत्यक्ष माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितले, ‘मला भूक लागलीय. मला काहीतरी जेवायला दे.’
मी म्हटले, ‘काय देऊ तुम्हाला?’ ते म्हणाले, ‘काहीही दे.’ म्हणून मी स्वयंपाक घरात आलो. त्यात मला पोळ्या वगैरे काहीही करता येत नव्हते. जीवनभर दोन मुली आणि बायको सोबत असल्यामुळे त्यांनी ती जाणीव मला कधी भासू दिली नाही.
मी स्टोव्ह पेटवला स्वप्नामध्येच! त्याच्यावरती तवा ठेवला, पीठ काढून ते परातीमध्ये मळले आणि पोळ्या करून महाराजांना खाऊ घालत होतो. खाऊ घालता-घालता भूक पूर्ण झाल्यावर ते म्हणाले, ‘बस्स! आता नको’ आणि ते चालायला लागले. जाताना त्यांनी माझ्याकडे पाठ केली मी तेव्हा मी त्यांच्याकडे पाहिलं. जवळजवळ पंधरा फूट लांब आणि दहा फूट रूंद अशी एकदम पांढऱ्या रंगाची ती प्रचंड मूर्ती होती. हळूहळू ती मूर्ती पुढे जायला लागली आणि तीची उंची कमी होऊ लागली. पुढे भिंत होती, भिंती लागूनच एक जांभळीचं झाड होतं. त्या जांभळीच्या झाडावरती माकडाच्या स्वरूपामध्ये महाराजांनी उडी मारली, त्यानंतर ते गायब झाले.
सकाळ झाल्यावर माझा काजळे[1] नावाचा एक शिष्य आला आणि माझ्या चरणावर डोकं ठेवून म्हणाला, ‘बाबा आज माझं जीवन धन्य झाल.’ मी म्हटलं, ‘अरे बाबा काय झाले ते तर सांग!’
‘आता तुम्ही जास्ती ऊहापोह न करता मला पुढचा मार्ग दाखवा.’ अरे पण झालं काय ते तरी सांग?’
‘मी स्वतः ऐकलं की मध्यरात्री कोणीतरी बोलत होत म्हणून मला जाग आली. मी उठून ऐकायला लागलो.पण आवाज फार घोगरा होता. म्हणून मी सहज डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एक प्रचंड पांढरी मूर्ती तुमच्यासमोर बसली होती आणि तुम्ही आपल्या हाताने काहीतरी करून त्यांना जेऊ घालत होते. काय जेऊ घालत होते, ते मात्र दिसत नव्हतं.’
हे ऐकल्यानंतर मी त्याला म्हटलं, ‘अरे तु हे म्हणतोस आहे ते अगदी बरोबर आहे. मला हे स्वप्न मला रात्री पडलं. हे तुला कस कळलं.’
तो म्हणाला, ‘बाबा हे स्वप्न नव्हत! तुम्ही असं काय करताय.’
मग त्याने माझा हात धरून स्वयंपाकघरात नेलं. स्वयंपाकघर घराला लागूनच पण स्वतंत्र होतं. आठ बाय दहाची एक लहानशी खोली. तिथे त्यानं दाखवलं की, स्टोव्ह जळत होता, अजूनही तवा स्टोव्हवरतीच होता! बरच पीठ परातीमध्ये विखुरलेलं होतं! हे पाहून माझ्या मनातला संशय एका क्षणामध्ये गेला.
ज्यावेळेस हनुमंतरायांनी मला दर्शन दिलं, त्यावेळेस मी त्यांना साधा नमस्कारसुध्दा करू शकलो नाही. याचं मात्र मला खूप वाईट वाटलं.
पुढे असेच दिवस निघून गेले या गोष्टीला एक वर्षच झालेलं. 1980च्या ऑगस्ट महिन्यात माझी प्रमोशनवरती एस.यु. मध्ये बदली झाली ती माऊंटअबू याठिकाणी. तिथे असताना माझ्या घरामध्ये माकडं रोज येत. एकदा माझ्याकडे हात करून काहीतरी मागू लागली. मला प्रथम ते काही कळेना ही गोष्ट. तेव्हा हे हनुमंतराया असतील असा एक विचार करून त्या माकडांना रोज मी शेंगदाणे देत असे आणि तेसुध्दा माझ्या हातातून हिसकावून न घेता अतिशय प्रेमाने शेंगदाणे खात असत. हे जीवनातलं काय रहस्य आहे ते मी अद्याप जाणू शकलो नाही. पुढे कधी कळले तर जालंधरनाथ महाराजांची इच्छा!
[1] हवाईदलातील तेंव्हाच्या पद्धतीनुसार आपल्या क्वार्टरचा काही भाग मित्रांना त्यांच्या कुटुंबाला राहायला देण्याची पद्धत होती. त्यानुसार काजळे शेजारच्या रुममधे राहात असे, म्हणून त्याला आमच्या घरात काय चालले आहे याची कल्पना होती. शिवाय तो मला मानत असे. या प्रसंगानंतर तो माझा आवडता शिष्य झाला. काजळे नंतर हवाईदलातून बाहेर आल्यावर मला कित्येक वर्षे भेटला नाही. मात्र मी अपघातात सापडल्यावर अचानक चंदननगरच्या आमच्या घरी उपस्थित झाला व घरचे काय सेवा करतील अशी शारीरिक सेवा करून पुन्हा लुप्त झाला!
जय हनुमान
ReplyDelete