४. हनुमंतांनी पेपर टाकले!
भावाने मला पेपर टाकायला सांगितले. सकाळी साडेचार वाजता मी हिवाळ्यात पावसाळ्यात नवभारत टाईम्स नावाच्या प्रेसमध्ये जाऊन तिथून पेपर कलेक्ट करत असे. ते पेपर घेऊन मी हळूहळू वाटायला सुरूवात करायचो. पेपर वाटेपर्यंत कधी आठ साडेआठ म्हणजे तीन तास मला चालावं लागायचं. खूप थकून जायचो मी. पण उपाय नव्हता. नवतर घरी यायचं. अंघोळ करायची. नंतर शिळंपाकं रात्रीचं असेल तेच मला मिळेल ते मी खायचं आणि परत एअर इंडियाच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचो. कराची, दिल्ली, बॉंबेचे इकडचे तिकडचे पेपर यायचे, मराठा पेपरची एजन्सी होती भावाकडे. मराठा नावाचा पेपर यायचा आचार्य अत्रेंचा. शिवाय बाकी लोकसत्ता, पाकिस्तानी काही, टाईम्स ऑफ इंडीया पेपर हे सगळे पेपर यायचे त्याठिकाणी. ते आम्ही कलेक्ट करून परत वाटायला निघायचो. जवळजवळ अडीच तास पेपर वाटल्यानंतर परत घरी यायचो. जेवायचो,
एके दिवशी काय झालं. मला ताप आला. पाऊस पडत होता त्या दिवशी. हाफ चड्डी आणि हाफ शर्टचा होता माझ्याकडे. तिसरं कोणी घेतलंच नव्हतं. पैजामासुध्दा नव्हता. पायामध्ये साधी चप्पलही नव्हती. कारण काय आधी चपला घेतल्या पण त्या दोन महिन्यामध्ये घासून जायच्या. म्हणून त्यांनी सांगितलं, ‘तु मूर्ख आहेस. तु पाय घासत चालतोस. आम्ही किती चपला घ्यायच्या.’ म्हणून त्या चपलाही बंद झाल्या. म्हणून पायीच चपला टाकायला सुरूवात केली. एकदा अंगात ताप होता तरी भाऊ म्हणाला, ‘आपला हा व्यवसाय आहे. तुला जायलाच पाहिजे. घरामध्ये बसून काय करतो. काय अंग थोडसं गरम झालय. ही गोळी घे आणि जा.’
गेलो, पेपर कलेक्ट केले आता अंगात बराच ताप भरला होता. पाच सहा ठिकाणी किंवा दहा ठिकाणी पेपर वाटले. तेवढ्यात मी कॅम्प हनुमानला पोहोचलो अहमदाबादला. त्यावेळी त्या मंदिराचा जिर्णोध्दार चालला होता. काही पिलर उभे केले होते. मी तिथे गेलो. तिथला पुजारी माझ्या ओळखीचा होता. तो माझ्याकडचा पेपर वाचायचा. गोड बोलायचा. म्हटल, ‘मला ताप आलाय.’ ‘कोई बात नही अभी ठिक हो जाएगा।‘ म्हणून त्याने मला कसलातरी काढा करून पाजला. म्हणाला, ‘हनुमानजी का नाम ले लो सभ ठिक होगा।‘
मी समोरच्या पिलरला पाठ टेकवून बसलो. हनुमंताकडे पाहिलं. हातामध्ये डोंगर घेतलेले हनुमंत एका हातामध्ये गदा. एवढी परमेश्वराची मूर्ती पाहून त्यांना नमस्कार करायच्या ऎवजी मी त्यांना शिव्या द्यायला सुरूवात केली. इतक्या अचकट विचकट शिव्या दिल्या. ‘कशाला हा पर्वत हातात घेतलाय. तो माझ्या डोक्यावर टाक. त्या पर्वताला खाली ठेव माझे पेपर तरी टाक. तो डोंगर नुसता घेऊन काय उपयोग.’ खूप शिव्या दिल्या मनात.
माझ्या अंगात ताप होता. काही कळत नव्हतं. थोड्यावेळाने डोळे उघडून पाहिलं. म्हटलं, चला काढा घेतला आता निघावं, सायकलला पेपर बांधलेले असायचे. येऊन पाहिलं सायकल तिथेच पडली होती पण सगळे पेपर गायब झाले होते. पुन्हा नवभारत प्रेसमध्ये गेलो परत पेपर घ्यायला पाहिजेत. त्यांनी सांगितलं पेपर आता डिस्ट्रयब्युट झालेलं आहेत. आता सात वाजले आता एकही पेपर नाही. आज पेपर मिळणार नाहीत. भावाला येऊन सांगितलं. त्याने मला चांगला प्रसाद दिला. ताप असताना चांगला मार खाल्ला. प्रचंड शिव्या ऐकल्या. पण काय करणार. अंघोळ केली. कसातरी ब्रेकफास्ट केला आणि एअर इंडियाच्या ऑफिसमध्ये परत हजर झालो. कारण दुपारचे अनेक पेपर कलेक्ट करायचे होते. ते करून वाटले. दुसऱ्या दिवशी परत पेपर कलेक्ट करून वाटायला निघालो. तर लोक म्हणाले, ‘काल तू इतक्या लवकर आलात आज इतका उशीर का?’ प्रत्येक ठिकाणी ‘अहो काल तर आठ वाजताच पेपर आले. काल कोणी पेपर टाकले. तु काय करतो. तु नऊ-दहा वाजता पेपर काय आणतोस. आम्हाला ऑफिसला जायचं असतं.
मला आपलं वाटलं खरोखरच हनुमंताने पेपर टाकले आहेत. म्हणून परत आपण ड्रामा करून पहावा. कारण तिथे मला प्रसाद खायला मिळायचा. हरभऱ्याची हिरवी डाळ खायला मिळायची, शेंगदाणे खायला मिळायचे, तिथले महंत माझ्या चांगल्या ओळखीचे होते. मी परत डोळे मिटून परत तेच सोंग केलं हनुमंताला शिव्या दिल्या. परत पाठीमागे उठून पाहिलं. तर तिथे एकही पेपर नाही. म्हटलं ठिक आहे हनुमंत पेपर टाकतात अशी मनाची कल्पना केली. असे सात-आठ दिवस गेले. परत खरोखरच टाकतात की नाही हे पाहायला गेलो. नाहीतर आता खूप मार मिळेल या भीतीने परत पेपर टाकायला गेलो.
‘अरे पेपर तर आमचा सहाच्या आत येतो आणि किती वाजले आता आठ वाजून गेले. हे काय करताय तुम्ही? काल कोणी पेपर टाकला? आता म्हटलं पक्कं झालं की हनुमंतच पेपर टाकतात म्हणून आणि त्यांच्याकडून जवळजवळ महिना दीड महिना पेपर टाकून घेतले. म्हणजे त्यांनी टाकले. त्यात माझी प्रकृती अतिशय चांगली झाली.
आपले मत कळवावे
ReplyDelete