आमचे चितळे बाबा

आमचे चितळे बाबा
आपल्या नेहमीच्या स्थानावर विराजमान

Monday, 12 December 2011

१२. किस्सा दुसरा गुपित कथले गुरु महाराजांनी….

२. गुपित कथले गुरु महाराजांनी….

तु मायेपोटी आईवडिलांना परत जीवंत करशील..

गुरूंनी ऐन वेळी मदत न करून अवकृपा केली असा आपल्याला मनाचा भाव अनेकदा होतो. माझा ही एकदा झाला. त्यानंतर झालेल्या गुरुउपदेशानंतर जे होते ती गुरुवेच्छा आहे असा माझा भाव दृढ झाला.

त्याचे असे झाले... 1984च्या डिसेंबरच्या 27 तारखेला माझी आई आकस्मात ब्रेन हॅमरेजने गेली. माझं आईवडीलांवर अतिशय प्रेम. आई धडधाकट होती आणि तीचं वय चौऱ्याएंशी वर्षांचं असलं तरी ती स्वयंपाक करायची. म्हशीला चारा घालायची, तिचं शेण काढायची, दूध निघेल ते विकायची आणि आपला संसार चालवायची. आई गेल्यामुळे मला खूप दुःख झालं. त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते. टेलिग्राम आला तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मिळाला. फार वाईट वाटलं, तशीच सुट्टी टाकून निघालो. त्यावेळेस नेमकं काय झालं कळल नाही गाडी अकरा तास लेट. परत दुःख झालं. स्टेशनवर बसलो. बायको म्हणाली, अहो घाबरू नका! काहीतरी खावून घ्या. मी म्हटलं, आता माझी खायची अजिबात इच्छा नाही. मला आता घरी जाऊदेत. कसातरी निघालो तिसऱ्या दिवशी सकाळी देऊळगावराजाला[1] पोहोचलो. त्यावेळेस आईची राखसुध्दा सोडून झाली होती. खूप वाईट वाटलं मला. पण मी काही करू शकत नव्हतो. झालं गेलं विसरून गेलो.

हळूहळू काळाने दुःखावरत्ती पांघरून टाकलं आणि अगदी सहा महिन्यानंतर म्हणजे 25 जुलै 1985 साली वडिलाचं अकस्मात निधन झालं. टेलिग्राम आला. परत तोच खेळ. त्यादिवशीसुध्दा परत गाडी लेट. कसातरी घरी पोहोचलो. पण वडीलांची राखसुध्दा मी नदीमध्ये टाकू शकलो नाही. भावांनी गोळा केलेली फुलं एका डब्यात भरून ठेवली होती. ती घेऊन मी पुढे नाशिकला गेलो आणि जी काही दहा-अकरा-बारा दिवसांची क्रियाकर्मे असतात ती केली. आई-वडील म्हणून सव्वाष्ण व ब्राम्हण जेवायला घातले.

गुरूजी म्हणाले, यांना नमस्कार करा. खरेतर माझे आईवडील दुसरे कोणीसुध्दा असु शकत नाही. पण गुरूजींचे ऐकावं म्हणून मी त्यांना नमस्कार केला. तेरा दिवस निघून गेले. कसातरी घरी आलो आणि एक विशेष गोष्ट माझी आईसुध्दा गुरूवारीच सुर्यास्ताच्या आधी गेली. वडिलसुध्दा गुरूवारीच सुर्यास्ताच्या आधी गेले. माझी मोठी वहिनीसुध्दा गुरूवारीच सुर्यास्ताच्या आधी गेली. मोठे बंधू त्यांचे वय पंच्चाहत्तर वर्षाचं होतं. ते सुध्दा सुर्यास्ताच्या आधीच गेले. माझ्यापेक्षा मोठी बहिण पुण्याला भावाकडेच रहायला असे. ती आजारी होती आणि ती सुद्धा 16 डिसेंबर 2004 ला गुरूवारीच देवाघरी गेली. वहिनीसुध्दा देवाघरी गेली तीसुद्धा गुरूवारीच पुण्यात इनलॅक हॉस्पिटलमध्ये गेली. काय गुरूवारचं महत्व या मध्ये आहे हे काही मला कळत नाही. पण हे असं घडतं मात्र आहे.

घरी तेरा दिवसानंतर आल्यावर पुढचा गुरूवार आला. त्यावेळेस मी महाराजासमोर बसलो. महाराजांना म्हणालो, मी खरच एवढा पापी आहे का? साधी राखसुध्दा मी सावरू शकलो नाही. माझं त्यांच्यावर खूप प्रेम होतं, तुम्ही असं का केलत? तुम्ही मला आधी सांगू शकला असतात, मी कसही करून घरी पोहोचलो असतो. कमीतकमी मी त्यांच्या प्राण गेलेल्या देहाच्या चरणावरती डोकं ठेवून दोन अश्रूतरी गाळू शकलो असतो. तेसुध्दा सुख महाराजा तु मला मिळू दिल नाहीत. मला फार वाईट वाटतं.

हळूहळू महाराज दृष्टीसमोर प्रकट झाले. वेड्या वडिलाचं वय 97 वर्षांचं झालेलं होतं. आईचही वय 84 वर्षांच्या वर होऊन गेलं. ईहलोकातील त्यांचा काळ संपला होता. जो आला त्याला जावच लागणार आहे हे सत्य आहे. बाकी सत्य असेल किंवा नसेल. परंतु, त्यांना जायचं होतं म्हणून मी त्यांना घेऊन गेलो.

तुम्ही त्यांना घेऊन गेलात त्याबद्दल काहीसुध्दा वाद नाही. मी काहीसुध्दा बोलणार नाही. पण शेवटच दर्शन तरी व्हायला हवं होतं. एवढीच माझी इच्छा होती.

अरे, वेड्या तु नाथपंथी आहेस. माझा अनुग्रह तुला मिळालेला आहे. तु मायेपोटी त्यांना परत निर्माण करशील. म्हणून मी तुला तिथे पोहोचू दिलं नाही.

बाबा आपण तर मला आजपर्यंत संजिवनी मंत्र दिलेला नाही, तर मग मी त्यांना कसं उठवू शकलो असतो? आपण हे काय बोलता.

ते म्हणाले, अरे बाळा, तुझ्या हृदयातून आपोआप संजिवनी मंत्र स्फुरला असता आणि परत तुझ्या वडिलांना जिवंत केलं असतंस. आणि म्हातारपणातील कष्ट करत करत त्यांनी किती भोगलं असत? हे सगळं दूर करण्यासाठी तुझ्यावर तुझ्या भाषेत मी अवकृपा केली आहे. पण ही अवकृपा नाही. हे तू जाणून घे. सत्य एकच आहे. ज्यांनी योनीतून जन्म घेतला आहे त्याला परत हा देह ठेवून अनंतामध्ये विलीन व्हायचय.

गुरूमहाराजांनी मला माता-पित्याच्या उदाहरणाने जे समजावले ते मी कधीच विसरू शकत नाही.




[1] मराठवाड्यातील जालन्यापासून साधारण ३० ४० किमीवरील खेडेगाव. तेथे माझे बालपण व शिक्षण झाले. वडील गावचे पोलिस पाटील होते.

1 comment: