९. हवाईदलात जाण्याच्या आधी - सुरवातीच्या आठवणी.भाग - १
नमस्कार! आमचे चितळेबाबा या आत्मकथनाचा पुढील भाग सादर करीत आहे.
आमचे चितळे बाबा या लेखात आम्हाला आमच्या सर्व ओक कुटूंबियांना चितळेबाबांनी केलेल्या आशिर्वादांचा प्रभाव कसा जाणवतो त्याचे वर्णन केले. चितळेबाबा आपल्या लहानपणींच्या आठवणी सांगतात. नंतर माझ्यासारखा हवाईदलातील त्यांना पूर्वीपासून ओळखणारा भेटला की हवाईदलातील गंमतीजमती आणि किस्से यांचा हटखून उल्लेख होतो.
बाबांचे बालपण फार हलाखीत आणि कष्टमय गेले. त्याचे वर्णन करताना बाबा सांगतात माझे मोठे बंधू अहमदाबादला रहात असत. त्यांच्या कुटूंबात मी काळ काढला. त्यावेळी पोट कसेबसे भरणे हाच प्रश्न होता. शिक्षण कमी, बेकारी म्हणून त्यावेळी मी पहाटेच्यावेळी वर्तमानपत्रे घेऊन पायी ती वेगवेगळ्या भागात जाऊन वाटत असे. त्या सर्व प्रतींचा चोख हिशेब ठेवणे आणि महिन्याच्या शेवटी सर्व हिशेब घेऊन ते मालकाला देणे असे माझे काम कटकटीचे असे. अनवाणी पायपीट आणि वणवण ही तर रोजचीच. त्यात अहमदाबादसारख्या शहरातील अत्यंत कडक आणि भीषण उन्हाळ्याची झळ, सिमेंट किंवा डांबरी रस्ते, त्यावर हातात किंवा डोक्यावर वर्तमानपत्राचे गठ्ठे सांभाळत मी कमीतकमी पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंत लांब जात असे. घरी परतताना परत तितकाच पल्ला गाठावा लागे. कटू शब्द, उपाशी राहाणे, शारीरिक इजा अशा घरातील लोकांच्या हीन वागणूकीमुळे जीवनात निराशा वाटे. जीवन नकोसे वाटे.
एकदा त्यावेळची खंत सांगताना बाबा म्हणाले, ‘मला वाटते ते फ्रीप्रेस जर्नलचे मालक किंवा मॅनेजर असावेत. गुजराथी माणूस. शांत आणि प्रेमळ. एक दिवशी पेपर टाकता टाकता अत्यंत श्रमाने तहानलेला मी. त्यांचा पेपर टाकून मला जरा पाणी मिळेल का? म्हणून प्रार्थना केली. त्या गुजराती व्यक्तीने ‘आवो बैठो,’ म्हणून मला पाणी तर दिलेच परंतु एक दिवस खूप मोठा होशील, हे कष्टाचे दिवस संपतील असा आशिर्वाद व संदेश दिला. खरोखरच काही महिन्यात माझी पायपीट कायमची बंद झाली.
बाबा त्यावेळचा आणखी एक किस्सा सुनवतात तो आहे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे व बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतचा. तीनचार महिने झाले की मराठी व अन्य वृत्तपत्रांचे देणे-घेणे याचा हिशेब करण्यासाठी मला मुंबईला पाठवण्यात येत असे. असेच एकदा मी मराठाच्या कार्यालयात गेलो असताना गडगडाटी हास्य आणि रेकून मोठ्या आवाजात बोलणारे आचार्य अत्रे बाबांच्याकडे बघून म्हणाले, "काय रे मुला, किती आणलेस पैसे यावेळेला?" त्या पैशांचा हिशेब चुकता करत असताना ते माझ्याशी बोलत आणि त्यावेळच्या राजकारणावर भाष्य करत. मराठी माणूस हा कसा मागे पडत जातो, कष्टाला त्याची तयारी नसते, हे ते मान्य करत आणि बाबांना त्यांच्या त्या कष्टमय जीवनाचा अवमान मानू नये असा सल्ला देत. पलीकडेच बाळासाहेब ठाकरे किरकोळ उंचीचे व्यक्तिमत्व बसलेले असायचे. काही वेळा त्यांच्या समोर बसले असताना चहापाणी व्हायचे. त्यावेळेला ते विचारायचे, ’काय म्हणत होता तो?’ तो म्हणजे आचार्य. त्याची आपली काही नाही राजकारणावरची टिकाटिप्पणी चालू असायची. पत्रकारितेत नेहमी चालणारी कुरबुर, काम जास्त आणि पैसाही कमी, वर्तमानपत्र कसं चालवावं याची कमी जाण असणे व स्वैर आणि बेबंद वागणे आदी आचार्यांचे गुण बाळासाहेब बोलून दाखवत. अत्रांच्याकडे चहाचा कप मिळणार नाही. खरंय ना असे म्हणून ते लगेच त्यांच्या ठाकरी शैलीत टोमणे मारत. खुद्द बाळासाहेबांच्या घरी एकदा दिवाळीसाठी बाबांना जायचा प्रसंग आला. त्यावेळेला मीनाताईंनी दिलेली प्रेमळ वागणूक बाबांच्या त्या बालमनातील आठवणीत अजून कोरून ठेवलेली आहे. अनेक व्यक्ती मीनाताईंच्या लाघवी आणि प्रेमळ स्वभावामुळे जोडल्या गेल्या. असं विविध ठिकाणी बाबांच्याही वाचनात आले होते.
बाबांच्या सानिध्यात कळवा आपले अनुभव
ReplyDelete