आता घरची परिस्थिती सांगतो. आईवडीलाचं लग्न झाल्यानंतर त्यांना पहिली मुलगी झाली. सगळ्यात मोठी बहिण काशिताई. आज जर ती असती तर ती कमीतकमी नव्वद वर्षांची असती. त्यानंतर भाऊ गोविंद. तो 1995 साली देवाघरी गेला. त्यानंतरची बहिण ती सध्या जिवंत आहे. ती अहमदाबादला दिवेकरांकडे दिलेली आहे. तिचं घरचं नाव सखूबाई आणि सासरच नाव गिताबाई. त्यानंतर बहिण जिला पिशाच्चबाधा झाली आणि मी एअरफोर्समध्ये असताना ती देवाघरी गेली तीच नाव सुमन. त्यानंतर भाऊ झाला. त्याचं नाव धनंजय. तोही अडीच वर्षांचा होऊन देवाघरी गेला. त्यानंतर बहिण झाली. तीचं नाव मिनाक्षी. मिनाक्षीनंतर माझा जन्म झाला. माझ्यानंतरसुध्दा एक भाऊ झाला. त्याच नाव अशोक. तो अग्रीकल्चर डिपार्टमेंटमध्ये होता. तोसुध्दा पुण्यालाच असतो. त्यानंतर आणखी एक भाऊ झाला. त्याचं नाव अरूण. तो सुध्दा एक वर्षाच्या आत देवाघरी गेला. त्यानंतर आणखी एक भाऊ झाला. त्याचं नाव विजय. तोसुध्दा एक वर्षाच्या आत गेला. एक फार आजारी पडायचा. सुकायचा. पोट मोठं व्हायचं. असे दोन भाऊ गेले. परत नियतीचा काय खेळ असेल माहिती नाही आणखीन एक भाऊ झाला. त्याच नाव अजय. तो सुध्दा एक वर्षाच्या आत गेला. माझ्यानंतर झालेला फक्त एकच भाऊ सध्या जिवंत आहे. त्याचही वय जवळजवळ 68 वर्षांचं आहे. त्याच नाव अशोक.
आधी घरची परिस्थिती खूप चांगली होती. पुण्याच्या पंडितांची साडेपाचशे एकर शेती सिंदखेड राजाला होती. तिथे माझे आजोबा काम करायचे. तीन वर्षाच्या उत्पन्नापैकी दोन वर्षाचं शेतीचं उत्पन्न पंडितांना मिळायचं आणि एक वर्षाचं उत्पन्न माझ्या आजोबांना मिळायचं. सगळा खर्च तिन वर्षाचा त्यांनाच करायचा. घरची परिस्थिती खूप चांगली होती. दिवस आनंदात जात होते. परंतु, एके दिवशी माझी आजी आजारी आहे असं कळल्यानंतर आजोबा अकोल्याला गेले. तिथे त्यांच्या दोन मुली होत्या. आई तिथेच होती त्यांची. बायकोला भेटायला गेलेले आजोबा जाताना चांदीच्या रूपयाने भरलेली आणि सोन्याचं चार-पाच किलोचं भरलेलं भांड घेऊन गेले. पूर्वी बँका नव्हत्या.
ही गोष्ट फार जुनी आहे. नक्की सन मी सांगू शकत नाही. पण 1934 सालची गोष्ट असावी. तिथे आजी तर बरी झाली, पण आजोबांना रक्ताची हगवण लागली आणि ते देवाघरी गेले. वडिलांच्या काकांनी पेट्या उघडून आतलं सगळा ऐवज काढून ठेवला आणि त्यामध्ये दगड भरले. वडिलांना पत्र पाठवलं. वडील चौथ्या-पाचव्या दिवशी तिथे पोहोचले. ‘माधव, अरे काहीच नव्हतं रे भाऊंजवळ.’ त्यांना भाऊ म्हणायचे. ‘पहा या पेटीमध्ये दगडं मिळाली.’
वडील काहीएक म्हणाले नाहीत. ‘माधव तुला पाहिजे तर ही घेऊन जा.’ काकांनी असे मानभवीपणे म्हणत ज्या गोधडीवर त्यांचा प्राण गेला ती गोधडी वडिलांना दिली. माझ्या वडीलांचं महादेव पण त्यांना माधव म्हणत. माधवराव घरी आले विषण्ण मनाने. पंडितांनी त्यावेळी काही कारणाने शेतीसुध्दा काढून घेतली. ती जोग नावाच्या दुसऱ्या व्यक्तीला दिली. त्यामुळे आमच्यावर एकदम गरीबीची परिस्थिती आली. श्रीमंतीत वाढलेली मुलं एकदम गरीब झाली, अन्नाला लागली. काय करायचं कळेना. चार मुलीचं कसं होणार ह्या चिंतेत घराची दुर्दशा झाली. एका घरात राहत होतो नदीकाठी. प्लेग आला म्हणून जवळजवळ सगळं गाव खाली झालं. त्यात आम्ही गाव सोडून गावाच्या बाहेर गेलो.
परत कालांतराने आणखीन एक मुलगा झाला. तो म्हणजे मी.
No comments:
Post a Comment