आमचे चितळे बाबा

आमचे चितळे बाबा
आपल्या नेहमीच्या स्थानावर विराजमान

Monday, 12 December 2011

१४.कर्नल यादवांच्या घरी घडलेला किस्सा

आसामात ओळख झालेल्या कर्नल यादवांच्या घरी घडलेला किस्सा

संकलन - दि २७ ऑक्टोबर २०११.
असा अपमान कधी झालेला नव्हता !
आम्ही सहज गप्पा मारत असतान एक फोन आला. तो बाबांनी घेतला. तो खाली ठेऊन मग बाबा म्हणाले, आलेला फोन कर्नल यादवांचा होता थांबा तुम्हाला त्यांचा तो किस्सा सांगतो.. आम्हादोघांचा पुर्व परिचय हवाईदलातून झाला असल्याने बाबांना माझ्याशी बोलताना सहजच आर्मी व हवाईदलातील काहींच्या कथा सुनवायला हुरूप येतो. मी सरसावलो. मोबाईलवरील रेकॉडींगची तयारी करून तो बाबांच्या हाती देत त्यांना म्हटले, आता सांगा. हे रेकॉर्डींग नंतर मी मोबाईलवरून कॉम्पवर काढून ते एकांना ईमेल करून त्यांना टायपिंगकरायला पाठवले गेले. ते आपल्याला बाबांच्या आत्मकथनातून सादर होत आहे. 
 आसाम में बाबा के साथ.. कुर्सीपर कर्नल तिहोतिया,पीछे खडे... कर्नल दीप, कर्नल यादव तथा श्री. पवन अग्रवाल...बैठे सुभेदार, JWO दीक्षित, ब्रिगेडियर तोमर             
बाबा सांगतात,1996 मध्ये मी रिटायर्ड झालो. रिटायर्ड होण्यापूर्वी एक वर्ष आधी मी आसामला होतो. तिथं कर्नल यादवांची भेट झाली. पुष्कळ सामान्य शिपायापासून ते कर्नल ब्रिगेडियर वगैरे पर्यंत अनेक तेथे माझे शिष्य झाले. त्यातच कर्नल यादव होते. तिथे खूप चांगले वास्तव्य झाल्यानंतर मी इथे पुण्याला बदलून आलो. एकदा यादवांनी फार आग्रह केला म्हणून 1997 साली त्यांच्याकडे गेलो. तिथे त्यांनी माझं आदरातिथ्य इतकं केलं की ते शब्दाने वर्णन करता येत नाही. सगळं साजुक तुपामध्ये जेवण! हे! ते! हात पाय दाबून सेवा काय करणे, फळे खाऊ घालणे, वगैरे-वगैरे. असं होत असताना आता मी दुसऱ्या दिवशी निघणार, त्या रात्रीची गोष्ट. एका-एकी त्यांची मुलगी फार जोरात ओरडली. त्यावेळी त्या मुलीच वय असेल सतरा-अठरा. ती बारावी झाली होती किंवा होणार होती. आम्ही सगळे घरामध्ये धावलो. पाहिलं तर ती डोळे वाकडे तिकडे करून वेड्यासारखी काहीतरी पाहत होती, ओरडत होती.
मी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिला बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी मी परत दिल्ली आलो आणि परत दिल्लीवरून पुण्याला परतलो. हे घडलं राजस्थान-हरयाणाच्या बॉर्डरवरच्या अलवरच्य़ा जवळच्या गावामध्ये. नंतर झाली गेली गोष्ट मी विसरून गेलो.
नंतर काही दिवसांनी त्या मुलीची पुन्हा तब्येत फार बिघडली. ती दिवसा-रात्री एकाएकी ओरडायला लागली. म्हणून तिनं बाहेरसुध्दा जाणं सोडून दिलं. मला यादवांचा फोन आला की, बाबा तुम्ही एकदा मुलीला येऊन पहा तिला काय झालंय ते कळत नाही. सगळे डॉक्टर-वैद्य झाले, देव झाले, तंत्र-मंत्र झाले, काळे कमळीवाले बाबा झाले. सगळ्यांचे सगळे उपाय झाले. कुठे काही गुणच पडत नाही.
नेमक्या त्याच वेळेस दुर्देवाने आमच्या बायकोला ब्रेन हॅमरेज सारखा प्रकार झाला आणि मला कुठेच जाता आलं नाही. मला तिच्याकडे खुप लक्ष द्यावं लागलं. पत्नीली काही ऐकु येत नव्हतं, दिसतं नव्हतं, एक सारखी खाली पडत होती आणि मुलं फार लहान होती. ती शाळेत शिकत होती. अबु आणि पप्पु. मोठी मुलगी- संजूचं नुकतच लग्न ठरत होतं. कॉलेज झालं होतं ती नोकरी करत होती. अशा परिस्थितीत मी दिल्लीला जाऊ शकलो नाही. पुढे दुर्देवाने त्यांचे मला धमकीचे फोन येऊ लागले की, हे तुम्हीच केलेलं आहे. तुमच्यामुळेच हे झालेलं आहे. जर तुम्ही माझ्या मुलीला नीट नाही केलं तर आम्ही जाट आहोत. आम्ही असं करू आम्ही तसं करू वगैरे वगैरे... त्यांच्या बायकोने सुद्धा मला फोनवरून शिव्या दिल्या. यादव साहेबांनीसुद्धा मला खूप डाटलं. त्यांनी मला असा टॉर्चर करायला सुरूवात केली. पण काही करू शकलो नाही. मी जाऊ शकत नव्हतो कारण बायको खूप सिरीयस होती.
तो काळ निघुन गेला. पत्नी ठीक झाली आणि पुढे पाच-सहा महिन्यांनी मला वेळ मिळाल्यानंतर मी दिल्लीला गेलो. तेथून पुढे मी यादवांच्या घरी पोहोचलो. त्यांनी माझं पुन्हा आदरातिथ्य केलं आणि म्हटलं, आपने बहुत बुरा किया। हमने ऐसा सोचा, वैसा सोचा असं खूप बोलले. असं एकएक दटावणीखोर बोल त्यांनी लावले. मला वाईट वाटलं. मी म्हणालो, माझ्या मनात आपल्याबद्दल पाप नाहीये. तुमचं सगळ्याचं मी कल्याण केलयं, तर माझ्या मनात तुमच्या मुलीबद्दल काही शंका नाही. मी तसा मनुष्य नाहीये. तुमची काहीतरी चुक होतेयं. मी प्रेमाखातर तुमच्या घरी आलो. तुम्ही माझा जो आदरसत्कार केलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जिथं मनुष्य जेवतो, त्या थाळीला ब्राम्हण मनुष्य तरी भोक पाडत नाही.
तरी पण तुम्हाला हे मी केलय असं वाटतय तर ते माझं दुर्देव आहे मी त्याला काही करू शकत नाही. तुमाला काय करायचं ते करा. मी इथे आलेलो आहे. माझे तुकडे करायचे असतील तर करा.
त्यांचा रागरंग वाईटच दिसला. ते उर्मट भाषेमध्ये काही बाही बोलले. तरीही मी प्रयत्न करतो म्हणालो. मी यज्ञकुंड तयार केलं.
बाबांना थांबवून मी विचारले, ते बरे तयार झाले? बाबा म्हणाले, होना, त्यांना मुलगा बरी करून पाहिजे होती म्हणून त्यांनी तयारी केली.
त्याच्यासमोर मुलीला बसवलं. मी आवाहन करून प्रयत्न केला. रात्री नऊ वाजता आम्ही बसलो. दहा, अकरा, साडे अकरा काही उपयोग झाला नाही. ती माझ्याकडे पाहून हेटाळणीच्या सुरामध्ये हा-हा-हा हसायची. अरे तेरे जैसे बहुत देखे असं म्हणायची. परत हसायची. त्या हसण्यामध्ये एक कटुता दिसायची. आधीच मी गर्भगळीत झालेला. परगावी कर्नलच्या घरच्यांकडून अपमानित केलेला. त्यात जेसीओ म्हणून रिटायर्ड झालेला. आता काय करावं. काय करावं सुचेना. बाबा जालंधरमहाराजांना विनंती केली, कुलस्वामिनीला, महाबजरंगबलीला विनंती केली पण काय म्हणता कोणाकडूनही उत्तर येतच नाही अशी परिस्थिती झाली. हतबल झालो आणि ...
अचानक मला महाराजांनी चित्र दाखवलं. बाबांनी हातांनी हवेत गोलगोल करत म्हटले, गोल-गोल... मला आठवतं पिक्चर पाहत असताना कधीतरी असं गोलगोल काहीतरी दाखवायचॆ आणि आधी घडलेली घटना असं दाखवायचे. आणि माझ्या मनात आयडीया आली की हे पूण्यजन्मकर्माचं कारण तर नसेल. पिक्चरमध्ये दाखवायचे तसा तोपर्यंत याचा अनुभव कधीच आला नव्हता. हा पहिल्यांदा अनुभव आला. बॅकमध्ये काही घटना घडली असेल म्हणून म्हटलं हिला बॅक जन्मामध्ये घेऊन जावं. म्हणून हळुहळू स्वतः तिच्या बॅकमध्ये एंट्री केली आणि तिलाही खेचली त्या चक्रव्ह्यूहामध्ये. पन्नास, साठ, सत्तर, एंशी, दोनशे, अडीचशे, तीनशे, साडेतिनशे, चारशे, पाचशे, साडे पाचशे, सहाशे, साडेसहाशे, सातशे, आठशे, नऊशे, दहाशे, अकराशे, बाराशे वर्षे पुढे सरकत होती. ... गरगर...गरगर. एक एक जन्म...खटखट... तिच्याबरोबर मी आहेच... आणि एका जन्मात आल्यावर ती जोरात घोगऱ्या आवाजात ओरडली... व्हॉव व्हॉव करत... तिला मुळ रुपात मी पाहिलं. म्हटलं कोण आहेस ते सांग. ती हरामखोर, राक्षसीण होती. हा...हा... करून अंगावर आली. तिला म्हटलं आपल्यामध्ये इतकं अंतर आहे की तु माझं काहीच करू शकत नाही. हे अंतर तुझ्या बापालाही तोडता येणार नाही. पण मी मात्र प्रत्यक्ष तुझ्या या जन्मापर्यंत आलेलो आहे. मी तुला तोडू शकेन. हळूहळू तिने रागाचे रुप सोडून तरूण स्त्रीचं रूप धारण केलं. इतकी सुंदर नव्हती पण तरूण तरी नक्कीच होती आणि नमस्कार केला. म्हणाली महाराज, ही देवाची लीला आहे. तुम्हाला जर मला शिक्षा करायची असेल तर नक्कीच करू शकता. पण माझा याच्यात काहीसुध्दा अपराध नाही. मी राक्षसीण होते, कबुल आहे माझ्या हातून चुका झाल्या असतील देवाने त्यासाठी मला शिक्षाही दिल्या. काय द्यायच्या त्या. मी आता त्या योनीमध्येसुध्दा नाही. त्या योनीतून मी खूप दूर निघून गेलेली आहे. तुम्ही बोलावलं म्हणून यावं लागलं.
पण तु आहेस कोण?’ मी विचारले .. तुमच्या समोर बसलेली ती मीच आहे.’
पण ती घाबरते कशाला?... ओरडते कशाला?
काळाचा पडदा सरकला महाराजा आणि तिला आपलं पुर्वजन्मातलं स्वरूप दिसलं आणि ती ते भयानक रूद्र, भयंकर रूप पाहून ती घाबरली आणि त्यामुळेच एवढं घडलेलं आहे बाकी काही घडलेलं नाही.
मी काय करू म्हणजे ही मुलगी बरी होईल?’
काही नाही तुम्ही हा काळाचा पडदा बंद करा आणि हा परत उघडणार नाही याची काळजी घ्या. एवढं जर तुम्ही करू शकाल तर हिला त्रास होणार नाही. मी तुम्हाला वचन देऊन सांगेन. बाकी तुम्हाला मला जाळायचं असेल, मला काही शिक्षा करायची असेल ती तुम्ही करू शकता. तुम्ही तितके शक्तीमान आहेत. पण यात माझी काहीसुध्दा चूक नाही.
झालं...यज्ञ कुंड शांत झाले. तो आवेश मुलीचा ओसरला. मी तिला जागे करून म्हणालो, बोलं आता काय बोलायच तुला?
बाबाजी. ती मुलगी खाली वाकून नमस्कारकरून आता बोलायला लागली, क्या बताऊं? मुझे कुठ याद नहीं। अब सब अपनासा लगता है। त्याच्याआधी नुसती हसत होती.....
आणि असा तो बिकट प्रसंग बाबांच्या गोल गोल इशाऱ्यामुळे उलथवून लावला गेला. त्यानंतर पुढे तिचं लग्न झालं. तिला एक मुलगा- मुलगी आहे. आता नवरा लेफ्टनंट कर्नल आहे. पण नंतर हा तिला कधीच त्रास झाला नाही.
ही अशी आयुष्यात घडलेली अपमानकारक अपशब्द ऐकून घ्यायची एकमेव घटना की ज्यात मला काहीच कळत नव्हतं. किती तास बसलो. काय करायचं काय. कारण ते पिशाश्च नाहीच आहे. काही कारणामुळे तो काळाचा पडदा सरकला आणि ते तिचेच पुर्वरूद्र रूप बघुन ती घाबरली.
पुढे याच कर्नल य़ादवांनी व घरच्यांनी त्यांच्या घरातून निघताना व नंतर पुण्यात घरी येऊन पुन्हा पुन्हा अजीजीपुर्वक माफी मागितली. त्यानंतर आणखी एका प्रसंगातून कर्नल यादवांनी वेळेवर एकांना केलेली मदत फारच मोलाची होती. त्याचा किस्सा सांगेन नंतर कधीतरी...
-------- पुढे चालू....

13. किस्सा ३परमेश्वराची लीळा... “मुलीला मिळाली नेत्रशक्ती!”

3. परमेश्वराची लीळा...मुलीला मिळाली नेत्रशक्ती!

जीवनामध्ये नवीननवीन अनुभव कसे येतात आणि श्रद्धा कशी बळकट होते याचं आणखी एक उदाहरण. 1982च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये माझी नंबर दोनची मुलगी संजू. तिच्या एका मित्रासोबत खेळत होती. जवळ एक छोटसं बोराचं झाड होतं. त्या मुलाने त्या झाडाची फांदी आपल्याकडे ओढली आणि थोड्यावेळाने सोडून दिली. त्याच्या अगदी विरूध्द बाजूला मुलगी बसलेली होती. झाडाची फांदी एकदम डोळ्याला लागली आणि डोळ्यामध्ये काटा गेला. ती रडायला लागली. त्यावेळेस मी नेमका वडील आजारी असल्याकारणाने गावी गेलो होतो. मिसेसने मुलीला जवळ घेऊन बघितलं. तिच्या डोळ्याच्या पांढऱ्या भागावरती एक काटा दिसला. ती एकसारखी रडत होती आणि डोळा चोळत होती. काटा कोवळाच होता. तिने तो बाहेर काढला. तिला अंघोळ घातली.

दोन मुलं शैलेश आणि अभिजीत लहान होती. एकच मुलगी राजू. थोडी मोठीशी म्हणजे अकरा वर्षांची होती. घरामध्ये सगळ काम बायकोलाच करायला लागयचं. त्यामुळे ती वैतागलेली असायची. त्यात मी घरी नव्हतो. म्हणून तिला मारून कुटून अंघोळ घालून ती झोपवायला लागली. संध्याकाळी तिच्याकडे पाहिले तर डोळा खूप लाल झाला होता. त्यामुळे बायको तिला दवाखान्यात घेऊन गेली. दवाखाना म्हणजे काय काही कॉटचा छोटा दवाखाना. डॉक्टरने पाहिले काय झाले.

बायको म्हणाली, हिच्या डोळ्यामध्ये काल बोरीचा काटा गेला म्हणून भीती वाटते. लहानसा काटा आढळला. तो मी काढला. पण डोळ्यात तर आणखी काही नाही ते बघा. त्यांनी डोळा नीट पाहिला आणि म्हणाले, तुम्ही मूर्ख आहात. तुम्हाला काही अक्कल आहे की नाही. डोळयामध्ये मुलीच्या काटा गेलेला असताना ताबडतोब आणायला नको होतं का? हीचे वडील कुठे आहेत?

तिने सांगितलं की ते गावी गेलेले आहेत. त्यांनी ताबतोब अब्युलन्स पाठवून तिला आगऱ्याच्या एम एच (मिलिटर हॉस्पिटल) मध्ये पाठवले. डॉक्टर हजर नव्हते तिने कसातरी प्रयत्न करून दुसऱ्या डॉक्टरला बोलावलं. डोळ्याचा एक्सरे घेतल्यानंतर डोळ्याच्या एकदम मधोमध सेंटर रेटिनामध्ये एक काटा विराजमान आहे असं त्यांना दिसले. नंतर त्यांनी खूप प्रयत्न करून त्या काट्याला बाहेर काढल्यानंतर डोळ्यावरती फार लाली होती. औषधीसुध्दा दिली. पुढे मी परतलो. मला बोलावलं. खूप शिव्या घातल्या. हिच्याकडे लक्ष द्या. बहुतेक हा डोळा आता पूर्णपणे गेलेला आहे. कारण तिने डोळा चोळल्यामुळे रेटिना पूर्णपणे डॅमेज झालेला आहे. आता काही होऊ शकत नाही. तरीसुध्दा डोळा बरा होईल या आशेच्या किरणांनी मी देवाच स्मरण करीत होतो. ज्यावेळेस दुःख, संकट येतात त्यावेळेस देवाला आपण मनापासून हाक मारतो. अन्यथा ते एक प्रकारचं नाटकच असत असं त्यावेळेस मला वाटलं. मी फार हवालदिल झालो. मोठ्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये घेऊन गेलो. त्यांनीसुध्दा सांगितलं हा डोळा ठीक होऊ शकत नाही. डोळा पूर्ण गेलेला आहे.

तेवढ्यात एक आनंदाची बातमी कळली. मेरठमध्ये एक सरदारजी डॉक्टर बावा डोळ्याचे महातज्ञ म्हणून कळले. त्यांनी पुष्कळ लोकांचे डोळे नीट केले म्हणून त्यांच नाव होते. कसंतरी करून त्यांच्याकडे गेलो. पन्नास रूपये फी भरून... त्यांनी मला सगळं विचारलं... नांव-गाव काय करता वगैरे. मुलीला तपासलं, तपासल्यानंतर मला बाहेर घेऊन सांगितलं या मुलीच्या डोळ्याला मी काही करू शकत नाही. डोळा पूर्ण डॅमेज झालेला आहे. जगामध्ये हा डोळा कोणी नीट करू शकत नाही. पण घाबरू नका आता सूज ओसरत चाचली आहे, ती पूर्ण उतरल्यांनतर आणखी एक-दोन वर्षांनी आपण तिला आर्टिफिशियल आय लावू आणि तो असा लावू की तो आर्टिफिशियल आहे हे ओळखू पण येणार नाही.

मी परत आलो. फार उद्विग्न झालो होतो. पगार एकदम कमी, घरी मदत करायला लागायची. कसं करायचं काही कळत नव्हतं. असच जवळच्या पिक्चर हॉलमध्ये त्यावेळेस एक पिक्चर लागला तो पाहायला गेलो. अर्धा पिक्चर झाल्यानंतर विषण्ण मनानं बाहेर आलो. मोठं ग्राऊंड होतं समोर, तेथे डाकोटा नावाचे कॅटीन होते. त्याच्या मागेच ग्राऊंड होतं. तिथेच एका फलकावर जाऊन बसलो आणि नुसताच एकट्याशी बोलत होतो. बहुतेक पौर्णिमा असावी त्यादिवशी. पूर्ण चंद्र वरती येत होता. मी चंद्रालाही शिव्या घातल्या. अरे तु म्हणे सुख देणारा. मला थोडं तरी सुख दे. एकतर ब्राम्हणाच्या घरात जन्म मिळालेला आहे. घरी अतिशय गरीबीची स्थिती आहे. त्यात मी जर चुकलो असेल, माझ्या हातून जाणूनबुजून चुका झाल्या असतील तर त्याची शिक्षा मला दिलीत तर ती मला मान्य आहे. परमेश्वरा, नाथा. पण माझ्या लहान मुलीने काय अपराध केला. अजुन तर तीची नऊ वर्षाचही वय पूर्ण झालेलं नाही.

सदगुरू हे काय आहे. मदत करा.

तेवढ्यात एक जवळजवळ सात फुटाचा नाग माझ्याकडे जोरात येऊ लागला. ते पाहिल्याबरोबर मी जोरात पाय त्याच्यासमोर ठेवला व म्हणालो, चाव-चाव मला लवकर चाव, तिच्या आधी तरी मला घेऊन जा. तुझं कल्याण होवो.

त्या सापालासुध्दा काय वाटलं माहित नाही. त्याने रस्ता काढून तो तिथून सळकण निघून गेला. घरी आलो. अहो तुम्ही लवकर कसे आलात? पिक्चर सुटला का?,

म्हटलं नाही, माझं मन लागत नव्हतं म्हणून घरी आलो.,

मग तुम्ही थोडं जेवून घ्या.

नको मला जेवायची इच्छा नाही.

तिने खूप आग्रह केला. तेव्हा थोडासा भात खाल्ला. परत मुलीच्या अंगावरून हात फिरवला आणि झोपी गेलो. मध्यरात्री केव्हातरी दोन-तीन वाजता एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये दोन साधू आले. हिंदीमध्ये म्हणाले, क्या हो गया? क्यु दुःखी है?’

तुम्हाला माहितीय मुलीची काय अवस्था आहे. त्यामुळे मी दुःखी नाहीतर काय आनंदी होऊ.? नही बेटे, वैसे चिंता की कोई बात नही है। तेरा तेरे गुरूपर विश्वास है ना?

हा मेरा बहोत विश्वास है। लेकिन क्या करे, ज्यो भाग्य में वो तो में बदल नही सकता और शायद गुरू नही बदलना चाहते। उनकी मर्जी है।

बेटे ऎसे निराश मत हो। ये भस्म तेरे पास रखा है, ये उसकी आँखों पे घुमाते जा। यदी प्रभु ने चहा तो उसकी आँख ठिक हो जाएगी।

सकाळी ही गोष्ट बायकोला सांगितली. ती म्हणाली एकसारखा तुम्हाला मुलीचा डोळाच दिसतो आहे. एकसारखं तुम्हाला तेच तेच आठवतंय म्हणून तुमच्या मनातल प्रतिबिंब तुम्हाला स्वप्नामध्ये दिसलेलं आहे.

अहो गेलेला डोळा कधी परत येतो का? तो आता फुटलाय. काचेचा फुटलेला ग्लास कधी नीट होतो का? नाही ना. मग आपल्या नशिबात जे आहे ते सहन करायलाच पाहिजे.

मीही गप्प बसलो. सकाळीपासून मुलीच्या डोळ्याला रोज भस्म लावू लागलो. काही दिवसांनी मुलगी म्हणाली, बाबा मला आता डोळ्याने वाचता येतं.

म्हटलं, दाखव बघू वाचून. घरात मोठं कॅलेंडर होतं, त्यातल्या मोठ्या तारखा मात्र तिने मला बरोबर सांगितल्या. तिला अंधुस दिसत होतं. मला परत हुरूप आला.

मी क्षणाचाही विलंब न लावता तीन दिवसांची सुट्टी घेऊन परत मेरठला गेलो. तिथे डॉक्टर बावांना मुलीला दाखवलं. परत पन्नास रूपये भरले. ते म्हणाले, याच्या पूर्वी ती इथे आली होती का? म्हणलो, हो.

डॉ. म्हणाले, त्याचे डॉक्युमेंट आहेत का?’ ते डॉक्युमेंट मी त्यांना दाखवले. त्यांनी डॉक्युमेंट घेऊन क्षणभर दृष्टी टाकली. म्हणाले, तू मुरख है, अज्ञानी है। भाई, पचास रूपये बहोत जादा होते है। क्या तनख्वॉ मिलती है तुजको?’

तीनसो रूपये मिलती है।

फिर क्यु पचास रूपया खर्चा कर रहा है? ले जा तेरे पैसे। क्यु ऐसा कर रहा है? उसको कोई नही दिख रहा है। वो पागल है, बच्ची है छोटी है, तु तो बडा है ना। तुझे तो अकल है ना। देख ये एक्स-रे पुरा रेटिना फट गया है अंदरसे। वो ठिक नही हो सकता, जाओ।

परत मी त्यांना मी त्यांना सांगितलं, अहो आता तर मी पैसे भरलेच आहेत. आपण एकदा चेक करून घ्या ना.

ठीक है, तेरेपास जादा पैसे हो गये है, तो मै चेक करता हूँ। मेरा तो क्या धंदाही है।

परत त्यांनी तिला टेबलवरती घेतली. मी बाहेर बसलो होतो. पाच-दहा मिनिटांनी ते बाहेर आले. मी पण आशेने त्यांच्याकडे धावत गेलो आशेने. म्हटलो, डॉक्टरसाहेब, काय झालं हो?

हा-हा मै बाद में बताता हूँ। मुझे अभी थोडासा काम है। फिर मैं आता हूँ. कही जाना नही। यही बैठे रहो।

असं म्हणून तो डॉक्टर निघून गेला. पंधरा मिनिटांनी तो परत आला. आला तेव्हा त्याच्याकडे मोठं पेढ्याचे पाकिट होतं. जवळजवळ अर्धा-एक किलो पेढे असतील ते. एक नारळ, एक कापड आणि शंभर रूपयाची नोट त्याने माझ्या चरणावर ठेवून मला अक्षरशः नमस्कार केला. विचारलं, तु कोण आहेस? फौजी आहेस पण कुठला आहेस? सगळी चौकशी केली.

मैं तो मिरॅकलपर विश्वास नही रखता लेकीन ये तो मिरॅकल हो गया। इसकी आँख अपनीआप जुटने लगी है। शायद जिंदगी में आगे देखभी पायेगी ये कह नही सकता देखेगी या नही।

डॉक्टरसाहेब काहीतरी औषध तरी द्या हो.

दवा से कुछ नही होगा इसे. ये ऐसाही उपरवालेने चाहा तो ठिक होता है। गुरू की ताकद बहुत है। बाबा नानक तुझपर दया जरूर करेंगे। असं म्हणून त्यांनी मला प्रेमाने मिठी मारली.

तसाच घरी आलो. त्यावर बरेच दिवस गेलं आणि खरं वाटणार नाही तुम्हाला हळुहळू त्या मुलीचा पूर्ण बरा झालाय. आज संजू जवळजवळ चाळीस वर्षाची विवाहिता आहे. तिचा फुटलेला डोळासुध्दा 99.99 टक्के अजुन एकदम चांगला आहे. ती सुईमध्ये दोरासुध्दा ओवू शकते.

अशी ही परमेश्वराची लीळा आहे. म्हणून म्हणतात की, खऱ्या अंतःकरणाने देवाची पूजा केली, भक्ती केली, त्यांच्या पुढे विनम्र झालं, तर परमेश्वर काहीही करण्यासाठी तयार असतो. पण आपण प्रत्येक ठिकाणी कमी पडतो. कमी पडतो, कमी पडतो. कारण या मायारूपी जगामध्ये आपण वावरत आहोत. वासनांनी पूर्णपणे घेरलेलो आहोत. बुध्दि असुनसुध्दा विवेक पूर्णपणे संपलेला आहे. कशाच्यामागे आपण धावतोय हेच आपल्याला कळत नाही. रथचक्र हे हळुहळू पुढे जात आहे. अलख निरंजन! समाप्त

१२. किस्सा दुसरा गुपित कथले गुरु महाराजांनी….

२. गुपित कथले गुरु महाराजांनी….

तु मायेपोटी आईवडिलांना परत जीवंत करशील..

गुरूंनी ऐन वेळी मदत न करून अवकृपा केली असा आपल्याला मनाचा भाव अनेकदा होतो. माझा ही एकदा झाला. त्यानंतर झालेल्या गुरुउपदेशानंतर जे होते ती गुरुवेच्छा आहे असा माझा भाव दृढ झाला.

त्याचे असे झाले... 1984च्या डिसेंबरच्या 27 तारखेला माझी आई आकस्मात ब्रेन हॅमरेजने गेली. माझं आईवडीलांवर अतिशय प्रेम. आई धडधाकट होती आणि तीचं वय चौऱ्याएंशी वर्षांचं असलं तरी ती स्वयंपाक करायची. म्हशीला चारा घालायची, तिचं शेण काढायची, दूध निघेल ते विकायची आणि आपला संसार चालवायची. आई गेल्यामुळे मला खूप दुःख झालं. त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते. टेलिग्राम आला तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मिळाला. फार वाईट वाटलं, तशीच सुट्टी टाकून निघालो. त्यावेळेस नेमकं काय झालं कळल नाही गाडी अकरा तास लेट. परत दुःख झालं. स्टेशनवर बसलो. बायको म्हणाली, अहो घाबरू नका! काहीतरी खावून घ्या. मी म्हटलं, आता माझी खायची अजिबात इच्छा नाही. मला आता घरी जाऊदेत. कसातरी निघालो तिसऱ्या दिवशी सकाळी देऊळगावराजाला[1] पोहोचलो. त्यावेळेस आईची राखसुध्दा सोडून झाली होती. खूप वाईट वाटलं मला. पण मी काही करू शकत नव्हतो. झालं गेलं विसरून गेलो.

हळूहळू काळाने दुःखावरत्ती पांघरून टाकलं आणि अगदी सहा महिन्यानंतर म्हणजे 25 जुलै 1985 साली वडिलाचं अकस्मात निधन झालं. टेलिग्राम आला. परत तोच खेळ. त्यादिवशीसुध्दा परत गाडी लेट. कसातरी घरी पोहोचलो. पण वडीलांची राखसुध्दा मी नदीमध्ये टाकू शकलो नाही. भावांनी गोळा केलेली फुलं एका डब्यात भरून ठेवली होती. ती घेऊन मी पुढे नाशिकला गेलो आणि जी काही दहा-अकरा-बारा दिवसांची क्रियाकर्मे असतात ती केली. आई-वडील म्हणून सव्वाष्ण व ब्राम्हण जेवायला घातले.

गुरूजी म्हणाले, यांना नमस्कार करा. खरेतर माझे आईवडील दुसरे कोणीसुध्दा असु शकत नाही. पण गुरूजींचे ऐकावं म्हणून मी त्यांना नमस्कार केला. तेरा दिवस निघून गेले. कसातरी घरी आलो आणि एक विशेष गोष्ट माझी आईसुध्दा गुरूवारीच सुर्यास्ताच्या आधी गेली. वडिलसुध्दा गुरूवारीच सुर्यास्ताच्या आधी गेले. माझी मोठी वहिनीसुध्दा गुरूवारीच सुर्यास्ताच्या आधी गेली. मोठे बंधू त्यांचे वय पंच्चाहत्तर वर्षाचं होतं. ते सुध्दा सुर्यास्ताच्या आधीच गेले. माझ्यापेक्षा मोठी बहिण पुण्याला भावाकडेच रहायला असे. ती आजारी होती आणि ती सुद्धा 16 डिसेंबर 2004 ला गुरूवारीच देवाघरी गेली. वहिनीसुध्दा देवाघरी गेली तीसुद्धा गुरूवारीच पुण्यात इनलॅक हॉस्पिटलमध्ये गेली. काय गुरूवारचं महत्व या मध्ये आहे हे काही मला कळत नाही. पण हे असं घडतं मात्र आहे.

घरी तेरा दिवसानंतर आल्यावर पुढचा गुरूवार आला. त्यावेळेस मी महाराजासमोर बसलो. महाराजांना म्हणालो, मी खरच एवढा पापी आहे का? साधी राखसुध्दा मी सावरू शकलो नाही. माझं त्यांच्यावर खूप प्रेम होतं, तुम्ही असं का केलत? तुम्ही मला आधी सांगू शकला असतात, मी कसही करून घरी पोहोचलो असतो. कमीतकमी मी त्यांच्या प्राण गेलेल्या देहाच्या चरणावरती डोकं ठेवून दोन अश्रूतरी गाळू शकलो असतो. तेसुध्दा सुख महाराजा तु मला मिळू दिल नाहीत. मला फार वाईट वाटतं.

हळूहळू महाराज दृष्टीसमोर प्रकट झाले. वेड्या वडिलाचं वय 97 वर्षांचं झालेलं होतं. आईचही वय 84 वर्षांच्या वर होऊन गेलं. ईहलोकातील त्यांचा काळ संपला होता. जो आला त्याला जावच लागणार आहे हे सत्य आहे. बाकी सत्य असेल किंवा नसेल. परंतु, त्यांना जायचं होतं म्हणून मी त्यांना घेऊन गेलो.

तुम्ही त्यांना घेऊन गेलात त्याबद्दल काहीसुध्दा वाद नाही. मी काहीसुध्दा बोलणार नाही. पण शेवटच दर्शन तरी व्हायला हवं होतं. एवढीच माझी इच्छा होती.

अरे, वेड्या तु नाथपंथी आहेस. माझा अनुग्रह तुला मिळालेला आहे. तु मायेपोटी त्यांना परत निर्माण करशील. म्हणून मी तुला तिथे पोहोचू दिलं नाही.

बाबा आपण तर मला आजपर्यंत संजिवनी मंत्र दिलेला नाही, तर मग मी त्यांना कसं उठवू शकलो असतो? आपण हे काय बोलता.

ते म्हणाले, अरे बाळा, तुझ्या हृदयातून आपोआप संजिवनी मंत्र स्फुरला असता आणि परत तुझ्या वडिलांना जिवंत केलं असतंस. आणि म्हातारपणातील कष्ट करत करत त्यांनी किती भोगलं असत? हे सगळं दूर करण्यासाठी तुझ्यावर तुझ्या भाषेत मी अवकृपा केली आहे. पण ही अवकृपा नाही. हे तू जाणून घे. सत्य एकच आहे. ज्यांनी योनीतून जन्म घेतला आहे त्याला परत हा देह ठेवून अनंतामध्ये विलीन व्हायचय.

गुरूमहाराजांनी मला माता-पित्याच्या उदाहरणाने जे समजावले ते मी कधीच विसरू शकत नाही.




[1] मराठवाड्यातील जालन्यापासून साधारण ३० ४० किमीवरील खेडेगाव. तेथे माझे बालपण व शिक्षण झाले. वडील गावचे पोलिस पाटील होते.

११. अदभूत हनुमान दर्शन! बाबा सांगतायत काही आपल्या जीवनातील ३ किस्से –



बाबा सांगतायत काही आपल्या जीवनातील ३ किस्से –

1. अदभूत हनुमान दर्शन!

हे स्वप्न नव्हत! हनुमंतरायांनी मला दर्शन दिलं

डिसेंबर किंवा 1980 जानेवारीचा काळ. तारीख मला अचूक आठवत नाही. पहिला मुलगा शैलेश उर्फ पपु झाला होता. त्याच्या पत्रिकेमध्ये कर्क लग्न. व्दितीय स्थानामध्ये कन्या राशी येते. कन्या राशी म्हणजे मुलाच्या पाठीवरती मुलगी दाखवते. म्हणून हनुमंताची सेवा सुरू केली.

तीन-चार वर्षे पूर्ण सेवा केल्यानंतर मला त्यांनी दृष्टांत दिला की, मला आणखी त्रास देऊ नको. म्हणून मी पुढची सेवा बंद केली. 1980च्या जानेवारी महिन्यामध्ये एके दिवशी मध्यरात्री दोन-सव्वा दोन वाजता मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये हनुमंतराया प्रत्यक्ष माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितले, मला भूक लागलीय. मला काहीतरी जेवायला दे.

मी म्हटले, काय देऊ तुम्हाला?’ ते म्हणाले, काहीही दे. म्हणून मी स्वयंपाक घरात आलो. त्यात मला पोळ्या वगैरे काहीही करता येत नव्हते. जीवनभर दोन मुली आणि बायको सोबत असल्यामुळे त्यांनी ती जाणीव मला कधी भासू दिली नाही.

मी स्टोव्ह पेटवला स्वप्नामध्येच! त्याच्यावरती तवा ठेवला, पीठ काढून ते परातीमध्ये मळले आणि पोळ्या करून महाराजांना खाऊ घालत होतो. खाऊ घालता-घालता भूक पूर्ण झाल्यावर ते म्हणाले, बस्स! आता नको आणि ते चालायला लागले. जाताना त्यांनी माझ्याकडे पाठ केली मी तेव्हा मी त्यांच्याकडे पाहिलं. जवळजवळ पंधरा फूट लांब आणि दहा फूट रूंद अशी एकदम पांढऱ्या रंगाची ती प्रचंड मूर्ती होती. हळूहळू ती मूर्ती पुढे जायला लागली आणि तीची उंची कमी होऊ लागली. पुढे भिंत होती, भिंती लागूनच एक जांभळीचं झाड होतं. त्या जांभळीच्या झाडावरती माकडाच्या स्वरूपामध्ये महाराजांनी उडी मारली, त्यानंतर ते गायब झाले.

सकाळ झाल्यावर माझा काजळे[1] नावाचा एक शिष्य आला आणि माझ्या चरणावर डोकं ठेवून म्हणाला, बाबा आज माझं जीवन धन्य झाल. मी म्हटलं, अरे बाबा काय झाले ते तर सांग!’

आता तुम्ही जास्ती ऊहापोह न करता मला पुढचा मार्ग दाखवा. अरे पण झालं काय ते तरी सांग?’

मी स्वतः ऐकलं की मध्यरात्री कोणीतरी बोलत होत म्हणून मला जाग आली. मी उठून ऐकायला लागलो.पण आवाज फार घोगरा होता. म्हणून मी सहज डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एक प्रचंड पांढरी मूर्ती तुमच्यासमोर बसली होती आणि तुम्ही आपल्या हाताने काहीतरी करून त्यांना जेऊ घालत होते. काय जेऊ घालत होते, ते मात्र दिसत नव्हतं.

हे ऐकल्यानंतर मी त्याला म्हटलं, अरे तु हे म्हणतोस आहे ते अगदी बरोबर आहे. मला हे स्वप्न मला रात्री पडलं. हे तुला कस कळलं.

तो म्हणाला, बाबा हे स्वप्न नव्हत! तुम्ही असं काय करताय.

मग त्याने माझा हात धरून स्वयंपाकघरात नेलं. स्वयंपाकघर घराला लागूनच पण स्वतंत्र होतं. आठ बाय दहाची एक लहानशी खोली. तिथे त्यानं दाखवलं की, स्टोव्ह जळत होता, अजूनही तवा स्टोव्हवरतीच होता! बरच पीठ परातीमध्ये विखुरलेलं होतं! हे पाहून माझ्या मनातला संशय एका क्षणामध्ये गेला.

ज्यावेळेस हनुमंतरायांनी मला दर्शन दिलं, त्यावेळेस मी त्यांना साधा नमस्कारसुध्दा करू शकलो नाही. याचं मात्र मला खूप वाईट वाटलं.

पुढे असेच दिवस निघून गेले या गोष्टीला एक वर्षच झालेलं. 1980च्या ऑगस्ट महिन्यात माझी प्रमोशनवरती एस.यु. मध्ये बदली झाली ती माऊंटअबू याठिकाणी. तिथे असताना माझ्या घरामध्ये माकडं रोज येत. एकदा माझ्याकडे हात करून काहीतरी मागू लागली. मला प्रथम ते काही कळेना ही गोष्ट. तेव्हा हे हनुमंतराया असतील असा एक विचार करून त्या माकडांना रोज मी शेंगदाणे देत असे आणि तेसुध्दा माझ्या हातातून हिसकावून न घेता अतिशय प्रेमाने शेंगदाणे खात असत. हे जीवनातलं काय रहस्य आहे ते मी अद्याप जाणू शकलो नाही. पुढे कधी कळले तर जालंधरनाथ महाराजांची इच्छा!


[1] हवाईदलातील तेंव्हाच्या पद्धतीनुसार आपल्या क्वार्टरचा काही भाग मित्रांना त्यांच्या कुटुंबाला राहायला देण्याची पद्धत होती. त्यानुसार काजळे शेजारच्या रुममधे राहात असे, म्हणून त्याला आमच्या घरात काय चालले आहे याची कल्पना होती. शिवाय तो मला मानत असे. या प्रसंगानंतर तो माझा आवडता शिष्य झाला. काजळे नंतर हवाईदलातून बाहेर आल्यावर मला कित्येक वर्षे भेटला नाही. मात्र मी अपघातात सापडल्यावर अचानक चंदननगरच्या आमच्या घरी उपस्थित झाला व घरचे काय सेवा करतील अशी शारीरिक सेवा करून पुन्हा लुप्त झाला!