आमचे चितळे बाबा

आमचे चितळे बाबा
आपल्या नेहमीच्या स्थानावर विराजमान

Tuesday 11 December 2018

चितळेबाबा सांगतात आपल्या बहीण सुमनची पिशाच्च बाधा कशी दूर केली



2. बहीण सुमनची पिशाच्च बाधा कशी दूर केली?

माझे बालपण अतिशय गरीबीत गेलं. लहानपणी मलेरिया तर व्हायचा. पण पैसे तर नसायचे. म्हणून कडुनिंबाचा पाला उकळून ते औषध म्हणून घ्यायचं आणि त्याने आमचा मलेरिया बरा व्हायचा. हळुहळू शाळेत जायला लागलो आणि पाहता-पाहता मी नववीमध्ये गेलो. परत एक एक कुऱ्हाड कोसाळायला लागली. माझ्या नंतरची बहिणाला एकाएकी पिशाच्च बाधा झाली. खूप डॉक्टर केले. मांत्रिक-तांत्रिक आले करून गेले. पन्नास रूपये घेऊन गेले. त्यावेळेस पन्नास रूपये म्हणजे खूप असायचे. हा काळ होता 1954 सालचा. वैद्य आले, तांत्रिक आले पन्नास रूपये, पंचवीस रूपये, लिंबं – कापड काय जे त्यांना लुटता येईल ते लुटून गेले. परंतु, बहिणाला काहीएक आराम पडला नाही. पुढे असं कळलं की तिला कोणीतरी करणी केलेली आहे. म्हणून एक चांगला जुमड्याला जुमडा हे जालन्यापासून काहीतरी अठरा किलोमीटरवर गाव आहे. तिथे एक चांगला तांत्रिक होता. तो आला त्याचं नाव असरूबा. त्याने काहीतरी माणसाची दोन हाडं बांधून त्याला कुंकू वा शेंदुर काहीतरी लावून त्याच्यापुढे फुलं, अगरबत्ती लावून तो बहिणीची ट्रिटमेंट करत होता. मी लहान होतो त्यावेळी. बहिणीचे केस काळेभोर खूप लांब होते. गोरीपान होती ती. दुखण्याने जेवायला बसल्याबरोबर तिला उलट्या व्हायल्या लागायच्या आणि मग ती एक चमचाचमचाभर अन्न खाऊ लागल्याने ती फार अशक्त झाली होती. तांत्रिकाने तिचे केस धरले आणि ते जोरजोरात ओडले. एक लहानसा चाकू घेऊन तीच्या पाठीला लावला. "विचारलं तु कोण आहेस? बोल, बोल लवकर!" बहिण रडू लागली. माझ्याकडे बघून दुःखी अंतःकरणाने म्हणाली, अरे धनु बघ हा माझ्या पाठीला चाकू खोपतोय! हा केस ओतोय! खूप दुखतयं रे. मी त्या तांत्रिकाला म्हणालो, असरूबा अहो तिचे केस सोडा. तो चाकू तिला का टोचताय.
अरे म्हणे भाऊ तिला काय करणार नाही. ते पिशाच्च आहे. ते असच ढोंग करत असतं. ही करणी आहे हीला काढायलाच पाहिजे.
अहो तिला काढायला पाहिजे ते खरं आहे पण तुम्ही तिचे चाकू टोचताय, तिचे केस ओढताय तिला किती वेदना होत असतील. तुमचे केस ओढून पहा तुम्हाला कळेल ते. पण त्याने काही माझं ऎकलं नाही. तेवढ्यात मला राग आला. घरामध्ये तमाशा पाहण्यासाठी जवळजवळ पूर्ण घर भरलेलं होतं. त्यांना काय घरामध्य तमाशा चाललेला फुकट बघायला मिळतोय. आम्ही आपलं दुःखी अंतकरणाने समोर बसलेलो आहोत.
मी असरूबाला म्हणालो, आता माझ्याच्याने सहन होत नाही. हे तुमचं काय माणसाचं मुंडकं, हाडं वगैरे काय लावलय ते उचलून चालायला लागा. असरूबाला राग आला. असं काही नाही आहे. मी सांगतो ते ऎक. हा जो तु माणसाचं मुंडकं म्हणतो तो वेताळ आहे वेताळ आणि वेताळ हा पिशाच्च्यांचा राजा असतो. मी त्याला जागं केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल तु अपशब्द बोलू नकोस.
मी म्हटलं, हे बघ अपशब्द वगैरे गेले उडत. हे तु उचल मडं, नाहीतर मी त्याला पायाने उडवून टाकेन. त्याला राग आला. मला तु फक्त त्याला स्पर्श करून दाखव. तु स्पर्श करून दाखवलास तर तुला मानेन.
मी म्हटलं, स्पर्श करणार नाही त्याला लाथेनं उडवीन. आई-वडील मधे पडले. जमलेली लोकं मध्ये पडली. नको धनु असं काही करू नकोस. ते फार भयंकर असतं. तु अजुन लहान आहेस. मी म्हणालो, ते आधी बहिणीचे केस तरी सोड.
त्याने कसेतरी केस सोडले. बहिणीला आता हायसं वाटलं. नंतर मी त्या वेताळाकडे पाठ फिरवली. काय म्हणालास याला हात लावून दाखव मी त्याला हात लावला तर तु काय करशील? ‘मी तुझ्या चरणावरती लोळीन.
मी म्हटलं, मी हात लावत नाही. मी ताडकन त्याला उजवी लाथ मारली. कवटी उडली आणि तीनचार फुटावरून खाली पडली.
बाळा मी तुला सांगितलं होतं हात लावू नकोस. तु जास्तीत जास्त पंधरा मिनिटं जगशिल. त्यानंतर तुला आता रक्ताची उलटी होईल. तु खाली पडशिल. मी तुला वाचवू शकत नाही. तुझ्या बहिणीला वाचवू शकेन की नाही ते सांगू शकत नाही. पण तुला मी वाचवू शकणार नाही. कारण तु प्रत्यक्ष वेताळाला लाथ मारलेली आहेस.
मी म्हटलं, असं काही होत नाही. हे सगळे चाळे आहेत. मी बसून राहिलो. नंतर लोकांनी चहा वगैरे घेतला. पंधरा मिनिटं सोडून अर्धा तास झाला. मला काहीएक झालेलं नाही. माझं बी.पी. वाढला नव्हता की मला काहीएक झालेलं नव्हतं. फक्त रागानं थरथर कापत होतो. थोडावेळानं तो म्हणाला, असं आहे तर तुझ्या बहिणीच्या शरीरात जे पिशाच्च आणि जी करणी आहे ती काढून दाखव.
ते कसं काढायचं मला काही सुध्दा माहित नव्हतं. मंत्र नाही, तंत्र काही सुध्दा नाही. मी कसं काढणार. पण परत विचार केला. ठिक आहे आपण काढू. महादेवाचं नावं घेतलं. मारूतीचं नाव घेतलं. कुठल्यातरी आठवलं त्या देवतांचं नाव घेतलं. त्या पिशाच्चाला आव्हान केलं, चलं नीघ बाहेर. इथे क्षणभरसुध्दा थांबू नकोस आणि आश्चर्य वाटेल अजूनही गावातील कितीतरी लोक साक्ष आहेत या गोष्टीला. बहिण फक्त दहा मिनिटात पूर्णपणे बरी झाली.
असरूबांनी माझ्या चरणावरती डोकं ठेवलं. म्हणाला, बाबा तु कोण आम्हाला माहित नाही. पण एवढी प्रचंड शक्ती आम्ही कुठेसुध्दा बघितली नाही.
मलासुध्दा एक अहंकार झाला. वाटलं व्वाआपणसुध्दा हे करू शकतो. पण नंतर थोड्यावेळानंतर कळलं. आपल्याला काहीच येत नाही. जाऊ द्या झालं गेलं वाटेला लागलं. पुढे कसातरी 1957 साली मॅट्रिक झालो. पोटासाटी अहमदाबादला गेलो. तिथे अहमाबादमध्ये पेपर टाकून कसातरी जीवन जगत होतो. एअरफोर्समध्ये चान्स मिळाला. एअरफोर्समध्ये ट्रेनिंगला गेलो. 1961 साली त्याच वेळेस परत बहिणाला हा त्रास सुरू झाला. ट्रेनिंग सेंटरहून परत येणं मला शक्य नव्हतं. कारण कोर्स पूर्ण करायचा होता. त्यातच ती 14 जानेवारी 1962 ला देवाघरी गेली. खूप दुःख झालं मला.

No comments:

Post a Comment