आमचे चितळे बाबा

आमचे चितळे बाबा
आपल्या नेहमीच्या स्थानावर विराजमान

Tuesday 11 December 2018

गिरनार पर्वतावर बाबांची - गुरूंशी भेट

गिरनार पर्वतावर बाबांची - गुरूंशी भेट



गिरनार पर्वतावर चढायच्या १०,००० पायऱ्यांचा बिकट मार्ग
सादरकर्ता -  शशिकांत ओक, नविन तम - दि. 24 फेब्रुवारी 2012
‘मला आदेश आलाय 'भेटायला गिरनार पर्वतावर ये! मी चाललो केव्हा परतेन माहित नाही.' सगळे भक्तगण आणि घरचे लोक हादरले. मार्च 2011 ची ती सुरूवात असावी. झाले, बाबा जाणार गिरनारला म्हणून चर्चा सुरू झाली आणि बाबांनी आपले प्रयाण अहमदाबाद येथे केले. पुढे सात दिवसांनी बाबा परत आपले गुरूवारच्या पुजेला हजर! सगळ्यांना हायसे वाटले आणि शिष्यगणांना गुरूंची भेट कशी झाली याबद्दल उत्सुकता लागली.

सौराष्ट्र भागातील जुनागढ यापूर्वीचे संस्थान राजधानीचे स्थळ. स्थळापासून काही किलोमीटर अंतरावरील रिझव्ह फॉरेस्ट मधे सिंहाची पैदास व राखण केली जाते. याच गीरजवळ गिरनार पर्वतावर अनेक नरशार्दुल गेल्या हजारो वर्षापासून वास्तव्य करून आहेत. दत्तात्रय, गोरक्षनाथ अशा नवनाथांनी व काही अन्य महाभागांनी कठोर तपश्चर्या करून तेथे वास्तव्य केल्याच्या खुणा गुहा आणि गिरीकंदरातून मिळतात.


साधारण तीन हजार पायऱ्यांपाशी जैन तिर्थंकारांचे वास्तव्यही या पर्वतावर असल्याने गिरनार पर्वताची यात्रा भारतीयांना शेकडो वर्षापासून आकर्षित करते. बाबा म्हणजे आमचे चितळे बाबा, त्या भेटीचे वर्णन करताना म्हणतात, ‘जवळजवळ दहा हजार पायऱ्याचा तो मार्ग माझ्यासारख्या सत्तरी उलटलेल्या व्यक्तीला पाहून भयचकित व्हायला होते. गुरूंचे निमंत्रण, निश्चय व धीर करून मी निशंकपणे पायऱ्या चढायला लागलो.सकाळी सात-सव्वा सातची वेळ असेल. शंभर सव्वाशे पायऱ्या चढल्यावर आता पुढे एक पाऊल टाकणे शक्य नाही असे वाटून मी प्रार्थना केली, 'मला माफ करा, महाराजा! आपल्या दर्शनाला मी येऊ शकत नाही. इथुनच मला परतण्याची परवानगी द्या' असे मनोमन म्हणत लागलेली धाप शांत होते न होते तोवर असा चमत्कार झाला की परत फिरायचे सोडा नंतर फारसे कुठेच न थांबता एकदम साधारण आठ हजार पायऱ्यांपाशी गोरक्षनाथांची गुहा आली. तेथे थांबणे झाले!
चढणारे आणि उतरणारे यांची गर्दी तुरळक होती. त्या गुहेपाशी आल्यावर थोडासा विश्राम घेऊन गुहेचे दर्शन घेण्यास मी पायऱ्यांवरून तिकडच्या वाटेला लागलो. गुंफा म्हणजे काय? साधारण एक छोटीशी खोली असेल इतपत दगडाची खोबण! वज्रासनात बसण्याएवढी जागा! अंधार आणि शांतता!
प्रत्यक्ष गुहेपाशी एक वृध्द किलकिले डोळे करून वाटेत बसलेले. त्यांनी बाबांना भुवया उंच करून विचारले, 'क्युं आए हो?' ते गोसावीवजा व्यक्तिमत्वाचे वृध्द पाहून बाबांनी म्हटले, ‘गुरू के दर्शन के लिए आया हूँ।‘ असे म्हणून बाबांनी ‘अलख निरंजन’ अशी जोरदार हाक दिली. त्यावर त्या गोसाव्यांनी 'अल्लख निरंजन' असे प्रत्युत्तर दिले आणि म्हटले, ‘यहाँ तो कोई गुरू या बाबा है नही। ये तो खाली गुफा है।‘ म्हणून गुहेकडे बोट केले. बाबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पटकन सुलगावलेल्या बिडीचा एक दीर्घ झुरका घेत म्हणाले, ‘देखते है।‘ त्यावर ते गोसावीबाबा म्हणाले, ‘पता नही कितने लोग आये और चले गए। तुम्हें क्या वहाँ देखने को मिलेगा? खाली पत्थर!’ पुन्हा बाबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून म्हटले, ‘जो होगा वो गुरू देख लेंगे. मेरे लिए तो गुरूका बुलावा आया हुआ है। इसलिए मैं आया हूँ। आगे का वो जाने।‘
आता त्या गोसावीबाबांनी मान डोलावली, ‘ठीक है, तो आप जाओ अंदर। तिथे एक स्वस्तिकासारखे चिन्ह ढकलून पाहा.’ असे म्हणून स्मित हास्य केले. बाबांनी पुन्हा एकदा ‘अलख निरंजन’ असे म्हटल्यावर गोसावी बाबांनी ‘अलख निरंजन’ असे त्याला उत्तर दिले आणि ते समोर ठेवलेल्या राखेच्या ढिगाकडे पाहत बसले.

बाबा त्या गुहेत म्हणजे एक दहा बाय बाराच्या एका खडकाच्या कोनाड्यात जवळ गेले. स्वस्तिका प्रमाणे खूण असावी त्या खडकावर दरवाजा समजून साशंकतेने जोर दिला. जणू काही एखादा पुराणा दरवाजा उघडण्यासाठीच तयार होता! एक वाट तयार झाली आणि बाबा आपसुकपणे आत गेले आणि मागनं पुन्हा तो दगड एकमेकात चिकटून गेला. एकदम अंधार झाला. मिट्ट अंधारात काही कळत नव्हते. छातीची धडधड वाढली होती. हे काय अघटित झालय या विचाराने मन धास्तावले होते. नक्की काय घडलय याचा थांग लागेना आणि बाबा व्याकूळ झाले. हळूहळू मनाची शांती झाल्यावर त्यांच्या डोळ्यांना प्रकाशाची जाणीव झाली
.... आणि त्या प्रकाशात एक धीरगंभीर, भव्य रूप समोर आढळले.
‘आओ, मैने बुलालावा भेजा था।‘ बाबांची विचारणा झाली आणि बाबांची क्षणभर बोबडीच वळली.
……
पुढे बाबा म्हणतात, ‘मी साधारण तेथे अर्धा तासापेक्षा कमी म्हणजे सत्तावीस मिनिटे होतो. त्यावेळात त्या प्रखर व्यक्तिमत्वाच्या आभा वलयात मला अनेक गोष्टींचे खुलासे केले. काही चुका, काही अक्षम्य चुका व वर्तमानस्थिती व पुढील कार्याची दिशा यांचा झाडा घेऊन त्यांनी माझ्यावर सतत लक्ष असल्याचे दर्शवून दिले.’
‘आता तरी यापुढे सावध रहा’ असा सल्ला देऊन म्हटले, ‘आतातरी तुझी साशंकता गेली की नाही?’ हे पाहण्यासाठी तुला इथे भेटण्याचा आदेश दिला. इथे आलास यातून तुझी परीक्षा झाली.’
........ बाबांनी हात जोडून त्यांच्याकडे पाहून मानेने हो म्हटले आणि त्या कमी होत जाणाऱ्या प्रकाशाकडे पाहून डोळ्यातील घळघळणारे अश्रू सावरले. ‘गुरू महाराजा, चुका पदरात घ्या. सांसारिक जगात वागताना आपसुक चुका होतात. नंतर जाणीव होते की तेही एक माझ्याकडून करून घेतले जाणारं नाटक आहे. याची जाणीव मला सतत आहे. आपल्या आर्शिवादाने.’ बाबांनी पुन्हाःपुन्हा हात जोडले आणि प्रार्थना केली माझ्याकडून गुरूप्रेरणेने सतत आदेश मिळत राहोत आणि आयुष्याच्या अंतापर्यंत ते जनकल्याणाकरिता सदा उपयोगी ठरोत. आजचा दृष्टांत माझ्या आयुष्याचा अविस्मरणीय भाग ठरो.’
….प्रार्थना संपत नव्हती. पाय भरून आले होते. घामाच्या धारा होत्या. अंधारात चाचपडत. जिथे तिथे जोर लावून ढकलण्याचा प्रयत्न केला. पुन्हा खडक सरकून दरवाजा झाला. त्यातून मी बाहेर आलो. दुपारचे बारा वाजून गेलेले. बाहेर लोकांची ये-जा. ते गोसावीबाबा धुनीपाशी बसलेले. सत्यातील जगाचे चित्र माझ्या डोळ्यासमोर हळूहळू तरळू लागले. तेव्हा नुकताच झालेला तो अदभूत अनुभव सत्य होता याची पूर्णतः खात्री पटली.
‘क्यूं, क्या हुआ? असे म्हणून गोसावी बाबांनी मिचमिच्या डोळ्यांनी पाहिले. बाबांनी ‘अलख निरंजन’ म्हटले. त्यांनी दिलेली उदी कपाळाला लावली. अन त्यानंतर जे घडले ते अदभूत होते.' अलख निरंजन' पुकाराकरून गोसावी बाबाने माझ्याकडे पहात माझ्या हातात सात रुद्राक्ष आणि एक पांढऱ्या रंगाचा मोत्यासारखा खडा दिला! जणु ते सर्व माझ्यासाठी तयारच ठेवलेले होते! त्या वेळी क्षणभर वाटले, आत भेटलेले व्यक्तिमत्व तेच तर नव्हते? ‘अलख निरंजन’ चा पुकारा करत करत बाबा पुढे निघाले.
                              

                                 हेच ते सात रुद्राक्ष आणि मोत्यासारखा खडा.

बाबांचा हा अनुभव आम्हा शिष्यगणांना अदभूतकथन वाटते होते. नंतर वेळोवळी बाबांनी त्या घटनेचा उल्लेख केला. म्हणाले, ‘पुढे घसरगुंडीसारख्या जागेतून गेल्यावर, तो पहाड खाली उतरून पुन्हा दुसऱ्या पहाडावर चढण्याची एक जिकिरीची चढण चढून साधारण दहा हजार पायऱ्या चढून गुरुदत्तांचे स्थान आले.
तेथे बाबा दर्शन घेऊन परतले आणि वेगळ्या प्रकारची चमक जाणवली. त्यांचा हा अनुभव ऐकून त्यांच्या घरातील मुलांनी गिरनार पर्वताची व त्या गोरक्षगूहेची यात्रा केली. ना तेथे त्यांना गुहेतील खोबण दिसली ना ते धुनीवाले बाबा...

.....असे आमचे बाबा, नवनाथांच्या विशेषतः जालंधर नाथांच्या, आर्शीवादाने अनेक मानसिक आणि शारीरिक व्याधी औषधोपचाराने दूर करण्याने प्रत्येकाचा योगक्षेम साधण्यास सदैव तत्पर असतात.
... दर गुरूवारी त्यांच्याकडे सायंआरती मोठ्या आनंदाची असते. . शिवाय नवरात्रात देवीचे अधिष्ठान, अशा बाबांच्या काही आठवणी....
’अलख निरंजन!’


श्री अवधूत चिंतन दत्तात्रेय मंदिर, गिरनार धाम.





जुनागढ जवळ गिरनारचा नकाशा


1 comment: