आमचे चितळे बाबा

आमचे चितळे बाबा
आपल्या नेहमीच्या स्थानावर विराजमान

Monday, 12 December 2011

१०. हवाईदलात भरती व नंतरच्या मजा - भाग २


१०. हवाईदलात भरती नंतरच्या मजा - भाग

असे करत असताना एकदा हवाईदलात भरती असे त्यांच्या वाचनात आले आणि त्यांनी तो अर्ज भरला. मॅट्रिकपर्यंत कसेबसे शिक्षण, मराठी माणसाची इंग्रजी बोलण्याची पंचाईत यामुळे आपला पाडाव लागणार नाही अशीच बाबांची धारणा होती. परंतु, पुढे विविध कारणांनी बाबांची हवाईदलातील अनेकांची जीवने उद्धरायची असल्याने बाबांना हवाईदलात नोकरी मिळाली आणि एसी 2 म्हणजेच एअर क्राफ्ट्समन 2 म्हणून ते भरती झाले. एकंदरीत बेताच्या इंग्रजी संभाषण कलेमुळे त्यांना इक्विपमेंट असिस्टंट असा ट्रेड म्हणजे कामाचा प्रकार मिळाला. होता होता पुढे बाबा मास्टर वॉरंट ऑफिसर या उच्चपदाला पोचून १९९६ला निवृत्त झाले. सदतीस-अडतीस वर्षांचा हवाईदलातील मधला हा काळ कसा चुटकीसरशी गेला असे ते वेळोवेळी म्हणतात.

हवाईदलात अगदी सुरूवातीला त्यांची मुंबईच्या कॉटनग्रीनला बदली झाली. त्या स्टेशनमध्ये रिपोर्ट करण्याच्या आधीच एक दिवस त्यांची एकाशी शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर त्यांच्या असे लक्षात आले की तोच त्यांचा बॉस होता. पुढे कटू प्रसंग टाळण्यासाठी त्यांना देवळालीला (२५ ईडी - इक्विपमेंट डेपो) काही महिन्यासाठी पाठवण्यात आले. बाबांनी थोडेसे नाराजीनेच देवळालीला प्रयाण केले. परंतु, ईश्वर कृपेने तेथे आणखी काही वेगळाच प्रकार पुढे वाढून ठेवला होता. त्याठिकाणी त्यांची रेल्वेस्टेशनवर काशीविश्वेश्वर महाराजांची गाठ पडणे, त्यांनी त्यांना रेल्वेच्या एका पुलाखाली पुढील कार्याच्या दिशेसाठी एका अदभुत अनुभवाची प्रचती देणे वगैरे गोष्टी तेथे घडल्या.

बाबा सांगतात एकदा 1965च्या संग्रामात मी अंबाल्याला होतो. सुरूवातीच्या पाकिस्तानी हवाई हल्ल्यात सगळीकडे पळापळ व घबराट झाली. बाँबचे गोळे विमानपट्टीवर कोठेही कोसळत होते. त्यामुळे निर्माण होणारे भलेमोठे खड्डे आणि त्यातील स्प्ल्रिंटरचा मारा होऊन अनेकजण जखमी होत होते. बाबांना त्या अनुभवातूनही जावे लागले आणि त्यांना शारीरीक त्रास होऊन पाठीच्या कण्याला कायमची इजा झाली.

इजेवरून आठवले मध्यंतरी काही वर्षापूर्वी बाबा आपल्या एका शिष्याची भेट घेण्यासाठी स्कूटरवरून निघाले. अंधार पडण्याची वेळ, वाहनांनी गजबजलेला रस्ता, घरापासून थोडे अंतर कापून गेल्यावर बाबांना जोरात धक्का बसला आणि ते वाहनावरून फेकले गेले. घटनेला पाहणाऱ्या लोकांनी ताबडतोब बाबांनी ओळखले आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था केली. घरचे आले, हॉस्पिटलमध्ये बाबांनी डोळे उघडले तेव्हा ते कोरेगाव पार्कमधील बुधराणी हॉस्पिटलमध्ये असल्याचे त्यांना लक्षात आले. बरगड्यांना मार लागून त्या अधु होऊन गेल्या. बरेच रक्त जावून अशक्तपणा आला. सर्व ट्रिटमेंटला काही महिने लागतील असा डॉक्टरांनी अंदाज व्यक्त केला होता. पण पुढच्या गुरूवारची आरती करायला बाबा आपल्या घरी हजर होते! पाचव्या दिवशीच मी ठीक आहे मला घरी जाऊ द्या. त्या मोडलेल्या बरगड्यांना प्लास्टर किंवा बाह्य उपचार करता येणार नाहीत अत्यंत कमी वेळात त्या कशा आपोआप ठीक झाल्या असे हॉस्पिटलमधील डॉक्टर लोकांनी आश्चर्याचे उदगार काढले.

आज बाबा गिरनारसारख्या दहा हजार पायऱ्या चढून जाऊ शकतात. विनम्रपणे आपल्या गुरूंना म्हणजेच नवनाथांपैकी जालंदरनाथांना सत्तराव्या वर्षातील त्यांच्या त्या हिम्मतिचे आणि धाडसाचे सर्व श्रेय ते वेळोवेळी देत असतात.

हवाईदलात असताना कानपुरला एक सायकल विक्रेता होता. बाबांनी त्या विक्रेत्याला आणि त्यांच्या कुटूंबियांना जी मदत केली त्याचा किस्सा ते सांगताना कधी-कधी डोळ्यात पाणी येते. आज तोच सायकलवाला एक मोठा वाहनांचा डीलर बनून बाबांना आग्रा व कानपुर भागात वारंवार भेट द्यायला बोलावतो.

बाबांचे अनेक शिष्य देशाच्या विविध भागात आहेत. त्यापैकी एक कर्नल तिहोतिया यांचे वेगळेच स्थान आहे. सहा फुटांपेक्षा उंच, अत्यंत भरभक्कम शरीरयष्टी, चेहरा व मान सिंहाप्रमाणे भरदार, बोलण्यात आणि वागण्यात मिलीटरीतील शिस्तीचा करारीपणा आणि वागण्यात हरयाणी रांगडेपण. कर्नल तिहोतियांचे आणि बाबा यांचे एकत्र येणे अजबच. कारण हवाईदलापेक्षा आर्मीमध्ये रँकवर फार प्रकर्षाने भर दिला जातो. ऑफिसरच्या क्वॉटर्समध्ये आदर रँकच्या व्यक्तींना प्रवेश कटाक्षाने टाळला जातो आणि तसेच ऑफिसर्सनी ओआरकडे म्हणजे ऑफिसर्स रँकच्या खाली व्यक्तींकडे जाणे सामान्यतः गैर मानले जाते. बाबांच्या बाबत माञ अनुभव उलटा आहे.

उच्च पदस्थ ऑफिसर्स ते अगदी सामान्य कार्पोरल किंवा शिपाईपर्यंत मराठी वा अमराठी सैनिकी पेशातील लोक बाबांकडे येतात तेव्हा समानतेची वागणूक अपेक्षित करतात. त्यामुळे ते आसाममध्ये बागडोग्र्याला असताना तिथल्या कमांडींग ऑफिसरच्या हुकूमांना न जुमानता अनेक आर्मीची वाहने व त्यातून त्यातून बडेबडे आर्मीचे ऑफिसर्स बाबांच्या छोटाश्या पण नेटक्या क्वॉर्टरमध्ये येत आणि आपल्यावरील शारीरीक व मानसिक संकटांची कहाणी सांगुन त्यातून आपली सुटका करून घेत.

आसाममध्ये असताना एअरमार्शल दुश्यंतसिंग हे इस्टर्न एयर कमांडचे मुख होते. त्यांच्या दराऱ्याच्या आणि जबरदस्त करारी व कठोर स्वभावाच्या अनेक गोष्टी आम्हा हवाईदलातील लोकांना अनुभवून ज्ञात आहेत. त्यांच्या अति कडक कारवायांमुळे त्यांचे नाव दुश्यंत ऐवजी दुश्मन असे चर्चेले जात असे. आसाममध्ये फार जलद गवताच्या हिरवळीची वाढ होते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक एअरमन व ऑफिसरला हातात तलवारवजा शस्त्र देऊन ते गवत कापण्याचा त्यांचा हुकूम बाबांना मानवला नाही. बाबांनी ते गवत कापायचे काम करणार नाही असे कमांडींग ऑफीसरला ठणकावून सांगितल्यावर त्यांची इन्स्पेक्शनला आलेल्या एअरमार्शल दुश्यंतसिंगांसमोर झाली आणि त्यावेळी बाबांनी इतके बाणेदार उत्तर दिले, ‘मी हवाईदलाची नोकरी गवत कापल्याला करत नाही. ते काम माझ्यासाठी लिहून ठेवलेले नाही. म्हणून मी ते काम करू शकत नाही. आपल्याला जे काही करायचे ते आपण करू शकता’. एकंदरीत बाबांचा रागरंग पाहून दुष्यंतसिंगांनी नरमाईचे धोरण आखले आणि त्यांच्यावर कारवाई न करता प्रश्न सुटून गेला आणि बाबांनी गवत कापायची तलवार कधी घेतली नाही.

आर्मिचरचे किटाळ व कोर्टमार्शलची पाळी, नागपुरला ‘कोण रे तू?’ म्हणणाऱ्या एकांची नंतर बाबा तुम्ही? म्हणून उडालेली तारांबळ आदि किस्से नंतर ...

असे अनेक किस्से बाबांच्या मुखातून ऐकताना वेळ कसा जातो कळत नाही.

९. हवाईदलात जाण्याच्या आधी - सुरवातीच्या आठवणी.भाग - १


. हवाईदलात जाण्याच्या आधी - सुरवातीच्या आठवणी.भाग - १

नमस्कार! आमचे चितळेबाबा या आत्मकथनाचा पुढील भाग सादर करीत आहे.

आमचे चितळे बाबा या लेखात आम्हाला आमच्या सर्व ओक कुटूंबियांना चितळेबाबांनी केलेल्या आशिर्वादांचा प्रभाव कसा जाणवतो त्याचे वर्णन केले. चितळेबाबा आपल्या लहानपणींच्या आठवणी सांगतात. नंतर माझ्यासारखा हवाईदलातील त्यांना पूर्वीपासून ओळखणारा भेटला की हवाईदलातील गंमतीजमती आणि किस्से यांचा हटखून उल्लेख होतो.

बाबांचे बालपण फार हलाखीत आणि कष्टमय गेले. त्याचे वर्णन करताना बाबा सांगतात माझे मोठे बंधू अहमदाबादला रहात असत. त्यांच्या कुटूंबात मी काळ काढला. त्यावेळी पोट कसेबसे भरणे हाच प्रश्न होता. शिक्षण कमी, बेकारी म्हणून त्यावेळी मी पहाटेच्यावेळी वर्तमानपत्रे घेऊन पायी ती वेगवेगळ्या भागात जाऊन वाटत असे. त्या सर्व प्रतींचा चोख हिशेब ठेवणे आणि महिन्याच्या शेवटी सर्व हिशेब घेऊन ते मालकाला देणे असे माझे काम कटकटीचे असे. अनवाणी पायपीट आणि वणवण ही तर रोजचीच. त्यात अहमदाबादसारख्या शहरातील अत्यंत कडक आणि भीषण उन्हाळ्याची झळ, सिमेंट किंवा डांबरी रस्ते, त्यावर हातात किंवा डोक्यावर वर्तमानपत्राचे गठ्ठे सांभाळत मी कमीतकमी पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंत लांब जात असे. घरी परतताना परत तितकाच पल्ला गाठावा लागे. कटू शब्द, उपाशी राहाणे, शारीरिक इजा अशा घरातील लोकांच्या हीन वागणूकीमुळे जीवनात निराशा वाटे. जीवन नकोसे वाटे.

एकदा त्यावेळची खंत सांगताना बाबा म्हणाले, मला वाटते ते फ्रीप्रेस जर्नलचे मालक किंवा मॅनेजर असावेत. गुजराथी माणूस. शांत आणि प्रेमळ. एक दिवशी पेपर टाकता टाकता अत्यंत श्रमाने तहानलेला मी. त्यांचा पेपर टाकून मला जरा पाणी मिळेल का? म्हणून प्रार्थना केली. त्या गुजराती व्यक्तीने आवो बैठो,म्हणून मला पाणी तर दिलेच परंतु एक दिवस खूप मोठा होशील, हे कष्टाचे दिवस संपतील असा आशिर्वाद व संदेश दिला. खरोखरच काही महिन्यात माझी पायपीट कायमची बंद झाली.

बाबा त्यावेळचा आणखी एक किस्सा सुनवतात तो आहे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे व बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतचा. तीनचार महिने झाले की मराठी व अन्य वृत्तपत्रांचे देणे-घेणे याचा हिशेब करण्यासाठी मला मुंबईला पाठवण्यात येत असे. असेच एकदा मी मराठाच्या कार्यालयात गेलो असताना गडगडाटी हास्य आणि रेकून मोठ्या आवाजात बोलणारे आचार्य अत्रे बाबांच्याकडे बघून म्हणाले, "काय रे मुला, किती आणलेस पैसे यावेळेला?" त्या पैशांचा हिशेब चुकता करत असताना ते माझ्याशी बोलत आणि त्यावेळच्या राजकारणावर भाष्य करत. मराठी माणूस हा कसा मागे पडत जातो, कष्टाला त्याची तयारी नसते, हे ते मान्य करत आणि बाबांना त्यांच्या त्या कष्टमय जीवनाचा अवमान मानू नये असा सल्ला देत. पलीकडेच बाळासाहेब ठाकरे किरकोळ उंचीचे व्यक्तिमत्व बसलेले असायचे. काही वेळा त्यांच्या समोर बसले असताना चहापाणी व्हायचे. त्यावेळेला ते विचारायचे, काय म्हणत होता तो?’ तो म्हणजे आचार्य. त्याची आपली काही नाही राजकारणावरची टिकाटिप्पणी चालू असायची. पत्रकारितेत नेहमी चालणारी कुरबुर, काम जास्त आणि पैसाही कमी, वर्तमानपत्र कसं चालवावं याची कमी जाण असणे व स्वैर आणि बेबंद वागणे आदी आचार्यांचे गुण बाळासाहेब बोलून दाखवत. अत्रांच्याकडे चहाचा कप मिळणार नाही. खरंय ना असे म्हणून ते लगेच त्यांच्या ठाकरी शैलीत टोमणे मारत. खुद्द बाळासाहेबांच्या घरी एकदा दिवाळीसाठी बाबांना जायचा प्रसंग आला. त्यावेळेला मीनाताईंनी दिलेली प्रेमळ वागणूक बाबांच्या त्या बालमनातील आठवणीत अजून कोरून ठेवलेली आहे. अनेक व्यक्ती मीनाताईंच्या लाघवी आणि प्रेमळ स्वभावामुळे जोडल्या गेल्या. असं विविध ठिकाणी बाबांच्याही वाचनात आले होते.

८. रेल्वेलाईनच्या खाली रामाचं देऊळ!


८. रेल्वेलाईनच्या खाली रामाचं देऊळ!

रेल्वे लाईनमधून चालत घेऊन गेले. नाशिक रोडकडे. आणि त्यानंतर जवळजवळ एक दीड किलोमीटरवर रेल्वेलाईनच्या पुलाखाली घेऊन गेले. तिथे एक रामाचं देऊळ होतं. त्याच्यामध्ये तीनचार मूर्त्या होत्या. तिथे मला बसवलं आणि म्हणाले गुरूच ध्यान कर. मला कुठे ध्यान करता येत होतं. पण मी आपलं ध्यान करत बसलो. ते थोड्यावेळानं परत आले. नंतर आम्ही परतलो. त्यानंतर मी कित्येकदा त्या ठिकाणी ते मंदिर पहायला पुलाखाली गेलो तर तिथे काहीच नाही ! त्यादिवशी खात्रीने मी काशी विश्वेश्वर महाराजांबरोबर रेल्वेपुलाखालील राम मंदिरात गेलो होतो हे नक्की पण मग नंतर ते कुठे गायब झाले मला सांगता येत नाही.

चल परत. परत आलो. तिथे स्टेशनमास्तरनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. तिथे जेवण घेतलं आणि ते म्हणाले, ‘तु आता माझ्या मठावर ये.’ त्यावेळी त्यांचा जांभळ्याला मठ होता. म्हणजे औरंगाबाद नाशिकच्या मध्ये चौदा किंवा अठरा किलोमीटरवरती डाव्या हाताला जांभळ्याला बाबांचा मठ होता. त्या मठामध्ये जावून मी सेवा सुरू केली. तेव्हापासून जवळजवळ पस्तीस वर्षे बाबांची सेवा केली. ९७ साली बाबा गेले. त्यांची सेवा केली. दरवर्षी सुट्टीत दोन महिने त्यांच्याजवळ जायचो. त्यांनी मला पुष्कळ शिकवलं. त्यांनीच मला मार्गावर आणलं. शिव्या दिल्या, मारलंही आहे, कष्टही खूप करून घेतले, पण प्रेमही तेवढच दिलं आहे. जिवंत आहे तोपर्यंत मी त्यांना विसरू शकत नाही. तेंव्हा गुरूचा साक्षात्कार झाला आणि मला पुढे कळलं मला एअरफोर्समध्ये का टाकलं. नाथपंथी एकसारखे फिरतात, एका ठिकाणी राहत नाहीत. ते फिरतच असतात. म्हणून त्यांनी मला त्यांनी हिंदुस्थानभर फिरवलं. तुम्हाला खोटं वाटेलं लोकहो, एअरफोर्समध्ये म्हणा मिलिटरीमध्ये म्हणा पीटी-परेड ही अगदी करायलाच पाहिजे. पण मी कधी पीटीला गेलो नाही, परेडला गेलो नाही. मी कधी अभ्यास केला नाही तरीसुध्दा मी पास झालो. मला कोणी विचारलं सुध्दा नाही की तु पीटीला का येत नाही. परेडला का येत नाही. एका सेक्शनमध्ये हे शक्य आहे. पण मी खूप सेक्शनमध्ये फिरलो. हे कसं घडलं आज जेव्हा विचार करतो तेव्हा कळतं मीच मूर्ख आहे म्हणून मला त्यावेळेस कळलं नाही. अहम झाला, मला कोणी विचारत नाही. प्रत्यक्ष महाराज तिथे माझ्या रूपामध्य ऊभे असतील. म्हणजे मी त्याठिकाणी प्रेझेंटच असेन म्हणून माझ्या अपसेंटीचा प्रश्नच येत नव्हता. ते आज कळतंय. पण आता वेळ निघून गेलेली आहे.

दि . २९ जून २०११.